JOIN US
मराठी बातम्या / विदेश / पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण?

Imran Khan: 20 ऑगस्ट रोजी इम्रान खान यांनी आयजी आणि न्यायाधीशांना धमकी दिली होती, त्यानंतर इम्रान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 ऑगस्ट : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून त्यांना कधीही अटक होऊ शकते.इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानातील दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत (Anti Terror Act) अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. 20 ऑगस्ट रोजी इम्रान खान यांनी आयजी आणि न्यायाधीशांना धमकी दिली होती, त्यानंतर इम्रान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रात्री उशिरा इस्लामाबादच्या (Islamabad) आयजींकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलं, अशी माहिती समोर आली आहे. इम्रान खान यांनी 20 ऑगस्ट 22 रोजी शाहबाज गिल यांच्या (Shahbaz Gill) अटकेविरोधात इस्लामाबादमध्ये रॅली काढली होती. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते. या रॅलीचं सर्व टीव्ही वृत्तवाहिन्यांनी प्रक्षेपण केलं होतं. याच रॅलीदरम्यान इम्रान यांनी इस्लामाबादमधील एफ-9 पार्कमध्ये एका जनसभेला संबोधित केलं होतं. या सभेत त्यांनी चिथावणीखोर भाषण केलं होतं. या रॅलीनंतर इम्रान यांच्यावर देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आणि पाकिस्तानमधील शांतता व्यवस्थेला बाधा पोहचवण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांच्यावर इस्लामाबादच्या आयजीसह अनेक पोलीस अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोपही आहे. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. याआधी पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीने (PEMRA) मोठं पाऊल उचललं होतं. PEMRA ने सॅटेलाईट टीव्ही चॅनलवरील त्यांच्या लाइव्ह भाषणावर (Live Speech) बंदी घातली होती. यासोबतच त्यांचं रेकॉर्ड केलेलं भाषण आणि वक्तव्यात कोणताही आक्षेपार्ह मजकूर नाही, हे तपासून प्रसारित करण्याचे आदेश दिले होते. ‘पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान हे सातत्याने त्यांच्या वक्तव्यांमध्ये आणि भाषणांमध्ये नियमांचे उल्लंघन करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यांची अशी भाषणं देशातील शांतता धोक्यात आणणारी आहेत. आदेशाच्या कॉपीमध्ये इम्रान खान यांच्या भाषणाचा काही भाग पर्शियन भाषेत लिहिला असून, त्यात अपशब्द वापरल्याचं म्हटलंय. हे पाकिस्तानमध्ये कलम 19 चे उल्लंघन आहे’, असं PEMRA ने जारी केलेल्या आदेशात लिहिलंय. दरम्यान, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटीने (PEMRA) ऑर्डिनन्स, 2002 च्या कलम 27(a) अंतर्गत, सॅटेलाइट टीव्ही चॅनेलवर सुरू असलेल्या इम्रान खान यांच्या लाइव्ह भाषणावर तात्काळ बंदी घातली होती. यासोबतच रेकॉर्ड केलेली वक्तव्ये आणि भाषणंही तपासली जातील आणि PEMRA च्या नियमानुसार तपासून प्रसारित केली जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. इम्रान खान यांनी केलं होतं भारताचं कौतुक भारताने (India) पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांत कपात केल्यावर इम्रान खान यांनी भारताचं कौतुक केलं होतं. खान यांनी आपल्या ट्विटमध्ये दक्षिण आशिया निर्देशांकाच्या रिपोर्टला टॅग केलं होतं. ज्यात म्हटलं आहे की, रशियाकडून अनुदानित इंधन खरेदी केल्यानंतर भारत सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 9.5 रुपये, डिझेलच्या दरात 7 रुपयांनी कपात केली आहे. भारताचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण असल्याने हे शक्य झालं. भारताने अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाकडून स्वस्तात इंधन विकत घेतलं आणि नंतर नागरिकांना दिलासा दिला, असंही ते म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या