नवी दिल्ली 11 जानेवारी : जीवघेणा हृदयविकार असलेल्या एका 57 वर्षीय व्यक्तीला अनुवांशिकरित्या सुधारित डुक्कराकडून हृदय मिळालं आहे (Man Receives a Heart From Pig). ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, जी अवयव निकामी झालेल्या हजारो रुग्णांना आशा देते. डुकराच्या हृदयाचं मानवामध्ये केलेलं हे पहिलं यशस्वी प्रत्यारोपण आहे (Doctors Transplanted a Pig Heart into a Human). यासाठी आठ तासांचं ऑपरेशन शुक्रवारी बाल्टिमोर येथे झालं आणि मेरीलँड विद्यापीठातील शल्यचिकित्सकांच्या म्हणण्यानुसार, मेरीलँडचा डेव्हिड बेनेट हा रुग्ण सोमवारी बरा झाला. वैद्यकीय केंद्रातील हृदय प्रत्यारोपण प्रोग्रामचे संचालक, ज्यांनी ऑपरेशन केलं त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बार्टले ग्रिफिथ म्हणाले, की हे हृदय अतिशय सामान्यपणे काम करत आहे. आम्ही हे करून दाखवलं. उद्या आणखी काय वेगळं समोर येईल, याची आम्हाला कल्पना नाही. याआधी अशी शस्त्रक्रिया कधीच झाली नाही.
गेल्या वर्षी, सुमारे 41,354 अमेरिकन लोकांना प्रत्यारोपण केलेले अवयव मिळाले, त्यापैकी निम्म्याहून अधिक जणांना मूत्रपिंड मिळाले. मात्र, अवयव दान करणाऱ्यांची मोठी कमतरता असल्याने दररोज अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. मागील वर्षी जवळपास 3,817 अमेरिकन लोकांना माणसांनी दान केलेल्या हृदयामुळे जीवदान मिळालं होतं. हा आकडा इतर वर्षांच्या तुलनेत खूप जास्त असला, तरी मागणी मात्र यापेक्षाही खूप जास्त होती. शास्त्रज्ञांनी डुकरांच्या अवयवाचा मानवी शरीरात कशा पद्धतीने वापर करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. नवीन जनुक संपादन आणि क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे गेल्या दशकात संशोधनाला वेग आला आहे. न्यू यॉर्कमधील शल्यचिकित्सकांनी ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या मूत्रपिंडाचे यशस्वीरित्या प्रत्यारोपण केल्यानंतर काही महिन्यांनी हे हृदय प्रत्यारोपण करण्यात आले.
किडनी आणि इतर अवयवांच्या डोनरच्या कमतरतेमुळे वाट पाहत असलेल्या अर्ध्या दशलक्षहून अधिक अमेरिकन लोकांना यापुढे अवयवांची कमतरता भासणार नाही. या अनोख्या प्रयोगामुळे वैद्यकशास्त्रात नवीन युग सुरू होईल, अशी संशोधकांना आशा आहे.