JOIN US
मराठी बातम्या / विदेश / Twitterच्या CEO पदी नियुक्तीनंतर पराग अग्रवाल यांच्यावर टीकेचा भडिमार; काय आहे कारण?

Twitterच्या CEO पदी नियुक्तीनंतर पराग अग्रवाल यांच्यावर टीकेचा भडिमार; काय आहे कारण?

सत्या नाडेला, सुंदर पिचाई या सिलिकॉन व्हॅलीतल्या दिग्गज भारतीयांच्या रांगेत आता पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे नाव समाविष्ट झालं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : सत्या नाडेला, सुंदर पिचाई या सिलिकॉन व्हॅलीतल्या दिग्गज भारतीयांच्या रांगेत आता पराग अग्रवाल (Parag Agrawal) हे नाव समाविष्ट झालं आहे. जॅक डॉर्सी (Jack Dorsey) यांनी ट्विटरला रामराम ठोकला असून, पराग अग्रवाल हे ट्विटर कंपनीचे पुढचे सीईओ (Twitter CEO) असतील, असं त्यांनी 29 नोव्हेंबर रोजी ट्विटद्वारेच जाहीर केलं. त्यानंतर भारतीयांची मान अभिमानाने न उंचावती, तरच नवल. त्यानंतर आपसूकच पराग अग्रवाल यांच्याबद्दलचे सर्चेस वाढू लागले. त्यांच्याबद्दलची माहिती प्रत्येक जण शोधू लागला. त्यांनी ‘आयआयटी-मुंबई’ (IIT Mumbai) या भारतातल्या प्रतिष्ठित संस्थेतून पदवी घेतली असल्याची माहिती अभिमानाने शेअर केली जाऊ लागली. तसंच, प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल ही त्यांची बालमैत्रीण असल्याचंही काही जणांनी शोधून काढलं. श्रेया घोषालने पराग अग्रवाल यांना काही वर्षांपूर्वी ट्विटरवरून दिलेल्या शुभेच्छा आणि त्यांना फॉलो करण्याचं आपल्या चाहत्यांना केलेलं आवाहन याचे स्क्रीनशॉट्स लगेचच शेअर होऊ लागले. ही जुनी ट्विट्स शोधता शोधता काही जणांना पराग यांनी काही वर्षांपूर्वी व्यक्त केलेलं एक मत सापडलं असून, त्यावरून वादाला तोंड फुटलं आहे. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हे वादग्रस्त ट्विट पराग यांनी 26 ऑक्टोबर 2010 रोजी केलेलं आहे. तेव्हा ते ट्विटर कंपनीत कार्यरत नव्हते. त्या ट्विटमध्ये पराग यांनी लिहिलं आहे, की ‘जर ते मुस्लिम (Muslim) आणि कट्टरतावादी (Extremist) यांच्यामध्ये फरक करू शकत नसतील, तर मी श्वेतवर्णीय (White) आणि वर्णभेदी (Racist) यांच्यामध्ये फरक का करू?’ पराग यांच्या याच ट्विटवरून वाद उफाळून आला आहे. सर्व श्वेतवर्णीय व्यक्ती वर्णभेदी किंवा वर्णद्वेषी आहेत, असा पराग यांच्या ट्विटचा अर्थ होत असल्याचं सांगून ट्विटरवर त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांना ट्रोल केलं जात आहे. #paragagrawalracist असा ट्रेंडही ट्विटरवर सुरू झाला आहे. हे ही वाचा- मोठी बातमी! Twitter च्या CEO पदावर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल दरम्यान, पराग अग्रवाल यांनी हे ट्विट तेव्हा केलं असलं, तरी त्यांनी ते वाक्य अवतरणात लिहिलं असल्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं आहे. म्हणजेच ते वाक्य त्यांचं स्वतःचं नसून त्यांनी दुसऱ्या कोणाच्या तरी तोंडचं वाक्य शेअर केलं आहे; मात्र हे लक्षात न घेताच त्यांना ट्रोल करणं सुरू झालं आहे. शिवाय, नंतर हेही स्पष्ट झालं, की त्यांनी हे ट्विट केलं त्याच वेळी त्या ओळी आसिफ मांडवी यांच्या असल्याचं लगेचच स्पष्ट केलं होतं; मात्र ते काहीही न पाहता अग्रवाल यांना अनेकांनी धारेवर धरलं आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यावरून तेव्हा बरीच टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, जॅक डॉर्सी यांच्याच पावलांवर पाऊल टाकून पराग अग्रवाल पुढे जात आहेत, अशी टीका काही जणांनी केली आहे. ट्विटर भेदभाव करून सेन्सॉरिंग करत असल्याचे आरोप केले जात असतात. त्यांना या ट्विटमुळे बळकटी मिळाली आहे; मात्र टीका करणाऱ्या एकाही व्यक्तीने पराग यांच्या त्या ट्विटची पार्श्वभूमी आणि त्या ट्विटमधलं वाक्य नेमकं कोणाचं आहे, याची माहिती घेण्याची तसदी घेतलेली नाही. त्यामुळे सीईओ झाल्यावर अभिनंदनाचा पाऊस सुरू होतो न होतो, तोपर्यंत टीकेच्या वर्षावाचा सामना पराग अग्रवाल यांना करावा लागला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या