ओट्टावा, 3 फेब्रुवारी : कॅनडाची (Canada) राजधानी ओट्टावामध्ये (Ottawa) सुरू असणाऱ्या ट्रकचालकांच्या आंदोलनात (Truck Driver Agitation) आता बंदुका (Gun) दिसायला सुुरुवात झाली आहे. कॅनडा ट्रकचालकांसाठी लसीकरण सक्तीचं करण्याचा कायदा सरकारनं केला होता. या कायद्याला विरोध करत हजारो ट्रकचालक सध्या रस्त्यावर उतरेल आहेत आणि सरकारला लसीकरणाचा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असणारं हे आंदोलन आता हिंसक मार्गाकडे वळू लागल्याचं दिसून येत आहे. ट्रकचालक आणतायत बंदुका आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करताना काही ट्रकचालकांनी सोबत बंदुका आणायला सुरुवात केली आहे, असा दावा कॅनडा पोलिसांनी केला आहे. शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी ही बाब अत्यंत धोकादायक असून सैन्याला पाचारण करावं लागू शकतं, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आंदोलनामुळे कॅनडाची राजधानी ओट्टावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून शहरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. नागरिक वैतागले कॅनडाच्या राजधानी ट्रक चालकांचं आंदोलन सुरु झाल्यानंतर अनेकांनी आपले ट्रक शहरात वाट्टेल त्या ठिकाणी वाट्टेल तसे लावले आहेत. त्याचा सामान्य नागरिकांना त्रास होत असून पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. कॅनडामध्ये ट्रकचालकांचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर कोरोना लसीविना आपल्या देशात येण्यास आणि व्यापार करण्यास कॅनडा सरकारनं परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर कायदा करून ही परवानगी रद्द करण्यात आली. आता लसीकरण पूर्ण केल्याशिवाय कुठल्याही ट्रकचालकाला धंदा करू देणार नाही, असा इशारा सरकारनं दिला आहे. तर काहीही झालं तरी कोरोना लसीकरणाबाबतची अट मागे घेतल्याशिवाय आंदोलनातून मागे न हटण्याचा निर्धार ट्रकचालकांनी केला आहे. हे वाचा- अमेरिकेला वाटतेय रशियाच्या घुसखोरीची भीती, युक्रेनपाठोपाठ युरोपातही सैन्य कॅनडा आणि अमेरिकेत व्यापार करणाऱ्या लाखो ट्रकचालकांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. एकूण 1 लाख 60 हजार ट्रकचालकांपैकी 32 हजार ट्रकचालकांना व्यवसाय करणं अशक्य होणार आहे. एकूण ट्रकचालकांपैकी 20 टक्के ट्रकचालकांवर या नियमामुळे बंधनं येणार असून त्याविरोधात ट्रकचालकांनी एल्गार पुकारला आहे.