लंडन, 20 ऑक्टोबर : ब्रिटनमधलं राजकीय संकट वाढत चाललेलं असतानाच लिज ट्रस यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लिज ट्रस या फक्त 44 दिवस पंतप्रधान राहिल्या. कालच ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन यांनी राजीनामा दिला होता. कर कमी करण्यासंबंधीच्या बदलामुळे लिज ट्रस यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सुरू झाला होता. लिज ट्रस यांच्या कंजर्व्हेटिव्ह पक्षातल्याच बहुतेक सदस्यांनी लिज ट्रस यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला होता. बहुतेक लोक लिज ट्रस यांना आता पंतप्रधान म्हणून पाहू इच्छित नाहीत, असा सर्व्हेही समोर आला होता. लिज ट्रस यांची प्रतिक्रिया राजीनामा दिल्यानंतर लिज ट्रस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्याची परिस्थिती बघता मी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, ज्यासाठी मी लढले होते. मी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत आहे, याची माहिती मी दिली आहे. मी पंतप्रधान झाले तेव्हा देशात आर्थिक स्थिरता नव्हती, असं लिज ट्रस म्हणाल्या. आम्ही कर कमी करण्याचं स्वप्न बघितलं. मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याचा प्रयत्न केला, पण याची अंमलबजावणी करता आली नाही, त्यामुळे मी राजीनामा देत आहे. पुढच्या पंतप्रधानाची घोषणा होत नाही, तोपर्यंत मी काळजीवाहू पंतप्रधान राहीन, असं लिज ट्रस यांनी स्पष्ट केलं.
लिज ट्रस यांच्या राजीनाम्याआधी ब्रिटनचे गृहमंत्री आणि अर्थमंत्री दोघांनीही राजीनामा दिला होता. कंजर्व्हेटिव्ह पार्टीमध्ये आता पुन्हा एकदा भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. लिज ट्रस यांना पंतप्रधान केल्याच्या निर्णयामुळे आपल्याला पसतावा होत आहे, असं कंजर्व्हेटिव्ह पार्टीचे अनेक सदस्य मान्य करत असल्याचं एका रिपोर्टमध्ये समोर आलं.