काबूल, 10 जानेवारी : गेल्या वर्षी (2021) ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) पूर्णपणे तालिबाननं (Taliban) आपलं वर्चस्व निर्माण करत सत्ता स्थापन केली. त्यावेळी अनेक अफगाण नागरिकांनी आपला देश सोडून जाण्याला प्राधान्य दिलं. अमेरिकेनं हजारो अफगाण नागरिकांना एअरलिफ्ट (Airlift) केलं होतं. त्यावेळी एका लहान मुलाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. एक हताश पालक विमानतळाच्या भिंतीवरून एका सैनिकाच्या हाती आपला तान्हा मुलगा देतानाचा हा व्हिडिओ होता. त्यानंतर हे बाळ बेपत्ता (Missing Baby) झालं होतं. मात्र, अथक प्रयत्नानंतर त्याचा शोध घेण्यात यश आलं आहे. शनिवारी (8 जानेवारी 2022) हे बाळ काबूलमधील त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आलं. सोहेल अहमदी (Sohail Ahmadi) असं या बाळाचं नाव आहे. हे बाळ 19 ऑगस्ट 2021 ला बेपत्ता झालं तेव्हा ते अवघ्या दोन महिन्यांचं होतं. नोव्हेंबरमध्ये ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेनं या बाळाबाबत एक स्पेशल स्टोरी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर हे बाळ काबुलमध्ये असल्याचं निदर्शनास आलं. हमीद साफी (Hamid Safi) नावाच्या 29 वर्षीय टॅक्सी चालकाला विमानतळावर हे बाळ सापडलं होतं. इतके दिवस त्यानं त्या बाळाचा सांभाळ केला. सात आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या वाटाघाटी आणि विनवणीनंतर शेवटी साफीनं बाळाला काबूलमध्ये (Kabul) असलेल्या त्याच्या आजोबा व इतर नातेवाईकांकडे परत दिलं. बाळाचे नातेवाईक आता त्याला अमेरिकेत (United States) त्याच्या आई-वडिलांकडं पाठवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या बाळाचे वडील, मिर्झा अली अहमदी (Mirza Ali Ahmadi) हे अफगाणिस्तानमधील यूएस दूतावासात (U.S. embassy) सुरक्षा रक्षकाचं काम करत होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यानंतर त्यांची पत्नी सुरैया आणि त्यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विमानतळावरील प्रचंड गर्दीमध्ये आपलं तान्ह बाळ चिरडलं जाईल अशी भीती त्यांना होती. म्हणून त्यांनी सोहेलला विमानतळाच्या भिंतीजवळ असलेल्या एका अमेरिकनं सैनिकाकडं सोपवलं होतं. आपण काही वेळात प्रवेशद्वारापर्यंचं 5 मीटर (15 फूट) अंतर पार करून पुन्हा बाळ ताब्यात घेऊ, असा बाळाच्या वडिलांचा समज होता. मात्र, तालिबानी सैन्यानं अचानक विमानतळावरील जमावाला मागं ढकलल्यामुळं अहमदी, त्याची पत्नी आणि त्यांची इतर चार मुलांना विमानतळाच्या आत जाण्यास आणखी अर्धा तास वेळ लागला. तोपर्यंत त्यांचं बाळं बेपत्ता झालं होतं. अहमदी यांनी बाळाचा कसून शोध घेतला. अमेरिकन अधिका-यांनी तर बाळ कदाचित सैनिकांच्या हातून देशाबाहेरही गेलं असेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. शेवटी आपण आपल्या बाळाविनाच टेक्सास गाठलं, अशी उद्विग्न प्रतिक्रिया बाळाचे वडील अहमदी यांनी रॉयर्टसला दिली होती. 20 वर्षांच्या युद्धानंतर यूएस लष्करानं (U.S. forces) अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. त्या गोंधळात अनेक लहान मुलांची आणि त्यांच्या पालकांची ताटातूट झाली. या मुद्द्यावर प्रकाश टाकणारी एक स्टोरी (https://www.reuters.com/world/when-are-my-parents-coming-1300-afghan-children-evacuated-us-limbo-2021-11- 10) रॉयटर्सनं प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये सोहेल अहमदी या बाळाची घटना हायलाईट करण्यात आली होती. सध्या अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन दूतावास आणि आंतरराष्ट्रीय संस्था अस्तित्वात नसल्यामुळं अमेरिकेतील अफगाण निर्वासितांना (Afghan refugees) आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यास अडचणी येत आहेत. यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स, स्टेट डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (Department of Homeland Security) यांनी देखील अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालण्यास नकार दिला आहे. सोहेल अहमदी नावाचं बाळ त्याच्या नातेवाईकांकडे सुरक्षित पोहचल्याच्या प्रकरणावर देखील अद्याप अमेरिकेनं काही प्रतिक्रिया दिलेली नाही. विमानतळावर दोन महिन्यांचा सोहेल होता एकटाच ज्या दिवशी अहमदी आणि त्याचं कुटुंब बाळापासून वेगळं झालं त्याच दिवशी टॅक्सी ड्रायव्हर हमीद साफी (Safi ) आपल्या भावाच्या कुटुंबाला सोडण्यासाठी काबूल विमानतळावर आला होता. त्याला लहानगा सोहेल जमिनीवर रडताना दिसला. त्यानं बाळाच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराच वेळ कुणीही त्या बाळाला घेण्यासाठी न आल्यानं त्यानं बाळाला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत बाळाचं कुटुंब सापडत नाही तोपर्यंत त्याच्या सांभाळ करण्याचा निर्णय साफीनं घेतला. साफीच्या कुटुंबानं बाळ सापडल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणीदेखील करून घेतली. त्यांनी बाळाचं नाव मोहम्मद आबेद असं ठेवलं. इतकंच काय त्यानं आपल्या इतर मुलांसोबत बाळाचे फेसबुकवर फोटोही पोस्ट केले होते, अशी माहिती रॉयटर्सला देत साफीनं आपली बाजू स्पष्ट केली आहे. बेपत्ता मुलांबद्दल रॉयटर्सनं केलेली स्टोरीमध्ये सोहेलचे काही फोटोही पब्लिश करण्यात आले होते. ते पाहून साफीच्या शेजाऱ्यांनी सोहेलच्या ठावठिकाणाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट आणि कमेंट्स लिहिल्या. हे पाहून बाळाच्या वडिलांनी अफगाणिस्तानात असलेल्या सासऱ्यांना (मोहम्मद कासेम रझवी, जे ईशान्य बदख्शान प्रांतात राहतात) साफीचा शोध घेण्यास सांगितलं. त्यानंतर सोहेलच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली करण्यात आल्या. रझवी यांनी साफीचा शोध घेतला आणि त्याच्याकडे सोहेलची मागणी केली. मात्र, अनेक भेटवस्तू, मांस, अनेक पाऊंड अक्रोड आणि कपडे देऊनही साफी आणि त्याच्या कुटुंबानं सोहेल परत देण्यास नकार दिला. कारण त्यालाही आपल्या कुटुंबासह अफगाणिस्तानातून बाहेर पडायचं होतं, अशी माहिती बाळाचे आजोबा मोहम्मद कासेम रझवी यांनी दिली. साफीनं बाळ देण्यास नकार दिल्यानं बाळाच्या कुटुंबानं रेड क्रॉसकडे (Red Cross) मदत मागितली. आंतरराष्ट्रीय संकटांमुळे विभक्त झालेल्या लोकांना पुन्हा कनेक्ट करण्याच काम रेड क्रॉस करते. मात्र, या प्रकरणात रेड क्रॉसला देखील जास्त काही करता आलं नाही. शेवटी बाळाच्या आजोबांनी स्थानिक तालिबान पोलिसांशी (Taliban police) संपर्क साधला आणि अपहरणाची तक्रार नोंदवली. मात्र, ड्रायव्हर साफीनं अपहरणाचे आरोप फेटाळून लावले. बाळाच्या आजोबांनी आमच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्ही बाळाची ओळख पटवली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि बाळाच्या पाच महिन्यांच्या देखभालीसाठी झालेल्या खर्चासाठी सुमारे एक लाख अफगाणी (अफगाणिस्तान चलन) दिल्यानंतर साफीनं बाळ परत देण्याची तयारी दर्शवली, अशी माहिती स्थानिक पोलीस स्टेशनचे मुख्य क्षेत्र नियंत्रक (chief area controller) हमीद मलंग यांनी दिली. पोलिसांच्या उपस्थितीत सोहेल नावाचं हे बाळ साफीनं त्याच्या नातेवाईकांकडे परत दिलं. ‘सोहेलला गमावल्याचं दु:ख साफी आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. हा सर्वांसाठी भावनिक क्षण होता. आमच्या बाळाला विमानतळावरून वाचवल्याबद्दल आमचं संपूर्ण कुटुंब कायम साफीचं ऋणी राहील’, अशी प्रतिक्रिया बाळाच्या आजोबांनी दिली. सध्या बाळ त्याच्या आजोबांकडे असून त्याला अमेरिकेत त्याच्या आई-वडिलांकडे पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अफगाणिस्तानमधील तालिबान संकटानंतर अशी शेकडो लहान मुलं आहेत, ज्यांची आणि कुटुंबाची ताटातूट झाली आहे.