अंजू-नसरुल्लाचं प्री-वेडिंग फोटोशूट
पेशावर, 25 जुलै : आपल्या प्रेमासाठी देशाची सीमा पार करून पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा प्री-वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओ समोर आला आहे. भारतामध्ये विवाह झालेल्या अंजूने पाकिस्तानमध्ये जाऊन इस्लाम धर्म स्वीकारला आणि खैबर पख्तुनख्वाच्या दीरमध्ये राहणाऱ्या नसरुल्लासोबत लग्न केलं आहे. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार नसरुल्ला आणि अंजूने जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीशाच्या उपस्थितीमध्ये लग्न केलं आहे. मलकंद डिव्हिजिनचे उप महानिरिक्षक नासीर महमूद सत्ती यांनी 35 वर्षांची अंजू आणि 29 वर्षांचा नसरुल्ला यांचा निकाह झाल्याचं सांगितलं आहे. अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर स्वत:चं नाव फातिमा ठेवलं आहे. अंजू आणि नसरुल्ला यांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये याची बरीच चर्चा होत आहे. हा व्हिडिओ पाहून अंजू आणि नसरुल्ला पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले दिसत आहेत. एक दिवस आधीच नसरुल्लाने अंजूसोबत प्रेम संबंध असल्याचा दावा फेटाळला होता. आपण अंजूसोबत लग्न करणार नसल्याचं नसरुल्ला म्हणाला होता. अंजूचा जन्म उत्तर प्रदेशच्या कैलोर गावात झाला होता आणि ती राजस्थानच्या अलवरमध्ये राहत होती. नसरुल्ला आणि अंजू यांची मैत्री 2019 साली फेसबुकच्या माध्यमातून झाली होती.
पेशावरपासून 300 किमी लांब असलेल्या कुल्शो गावातून नसरुल्लाने पीटीआयशी संवाद साधला होता. यात त्याने अंजू पाकिस्तानला आली आहे, पण आमची लग्न करण्याची कोणतीही योजना नाही. 20 ऑगस्टला वीजा संपल्यानंतर ती तिच्या देशात परत जाईल. अंजू माझ्या घरात कुटुंबातल्या अन्य महिलांसोबत दुसऱ्या खोलीमध्ये राहते, असं नसरुल्लाने सांगितलं.
पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयला अधिकृत पत्र पाठवलं आहे. यामध्ये अंजूला दीर जिल्ह्यामध्ये 30 दिवसांचा वीजा मंजूर करण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.