Passport: ‘या’ देशाचा पासपोर्ट आहे सर्वात प्रभावी, भारताचा नंबर कितवा? वाचा सविस्तर
मुंबई, 20 जुलै: भारतासह अनेक देशांमध्ये पासपोर्ट हा महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून वापरला जातो. पासपोर्टचा वापर विशेषतः परदेशात प्रवासासाठी केला जातो. परदेशात फिरायला जायचं असेल किंवा कामानिमित्त जायचं असेल तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट सोबत असावा लागतो. हा एक असा दस्तऐवज आहे जो तुम्हाला तुमची ओळख पटवण्यास मदत करतो. पण कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली (Powerful Passports in the world )आहे, हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना? चला सविस्तर जाणून घेऊया. कोविड-19 महामारीच्या काळात जवळपास सर्वच देशांनी परदेश प्रवासावर बंदी घातली होती. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ही बंदी हटवण्यात आली आहे. अनेक देशांनी उशिरानं परदेशात उड्डाण करण्यास सुरुवात केली. कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात प्रभावी आहे? जपान, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाचे पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहेत. Henley & Partners या इमिग्रेशन कन्सल्टन्सीच्या ताज्या Henley Passport Index नुसार, जपानी पासपोर्ट असल्यास 193 देशांत त्रास-मुक्त प्रवेश मिळतो. तर सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या देशांचा पासपोर्टही तितकाच शक्तिशाली मानला जातो. हेही वाचा: कर्मचाऱ्यांना आता ऑफिसमध्येच घेता येणार डुलकी; पण… अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वात कमजोर- दुसरीकडे, रशियन पासपोर्ट या अहवालात 50 व्या स्थानावर आहे. या पासपोर्टच्या माध्यमातून 119 देशांमध्ये सहज प्रवेश मिळतो. 80 देशांमध्ये प्रवेश मिळवून चीन 69 व्या क्रमांकावर आहे, भारताचा पासपोर्ट 87 वा आणि अफगाणिस्तानचा सर्वात कमी उपयुक्त पासपोर्ट आहे. अफगाणिस्तानचा पासपोर्ट असल्यास केवळ 27 देशांमध्ये प्रवेश सहजपणे मिळू शकतो. शक्तिशाली पासपोर्टच्या बाबतीत अमेरिका सातव्या स्थानावर- निर्देशांकानुसार, अलीकडे 2017 मध्ये जगातील 10 सर्वाधिक स्वीकृत पासपोर्टमध्ये युरोपीय देशांचं वर्चस्व होतं, तर आशियातील केवळ एका देशाचा समावेश होता. पण आता हळूहळू युरोपचे वर्चस्व कमी झाले आहे. याशिवाय जर्मनी आता दक्षिण कोरियाच्या मागे आहे. ताज्या क्रमवारीत असे दिसून आले आहे की ब्रिटन 187 देशांमध्ये सहाव्या स्थानावर आहे, तर यूएस 186 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, 17 वर्षांचा डेटा संकलित करणारा हा निर्देशांक श्रीमंत व्यक्ती आणि सरकारांना जगभरातील नागरिकत्वाचे मूल्य मोजण्यात मदत करतो.