नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : जगभरात अनेक विचित्र गोष्टी घडल्याचं ऐकिवात आहे. कोणी चुकून फळाची बी, पिन किंवा इतर लहानशा गोष्टी गिळण्याचं अनेकदा ऐकलं असेल. लहानशी गोष्ट चुकून गिळली गेली, ही बाब समजण्यासारखी आहे. परंत एका व्यक्तीने मोठा मोबाईल फोनच गिळल्याची विचित्र घटना समोर आली आहे. 33 वर्षीय व्यक्तीने Nokia 3310 मॉडेल फोन गिळल्याचं समोर आलं आहे. 2000 साली Nokia Company कडून बनवण्यात आलेलं 3310 मॉडेल मोबाईल फोन एका व्यक्तीने गिळला. 4 दिवसांपर्यंत फोन व्यक्तीच्या पोटात पडून होता. पण महत्त्वाची बाब म्हणजे हा व्यक्ती डॉक्टरकडे पोहचल्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं आणि त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. हा व्यक्ती रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याने इतका मोठा फोन गिळल्याचं सांगितलं. ही बाब ऐकून डॉक्टरही हैराण झाले होते. Balkan State मध्ये राहणाऱ्या 33 वर्षीय व्यक्तीसोबत हा विचित्र प्रकार नेमका कसा झाला, याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. व्यक्तीने गिळलेल्या या फोनमध्ये बॅटरी आणि लहान बटणंही होती. इतका मोठा फोन घशातून खाली गेला कसा ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. या व्यक्तीच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्यानंतर तो डॉक्टरकडे पोहोचला, त्यानंतर डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. एक्सरेमध्ये रिपोर्टमध्ये पोटात फोनचे तीन भाग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यापैकी एक भाग बॅटरीचा होता. हा सर्वाधिक चिंतेचा विषय होता. अधिक काळ बॅटरी पोटात राहिली असती, तर स्फोट होण्याचा धोका होता. बॅटरीतील हानीकारक रसायनांमुळे त्या व्यक्तीचा जीव धोक्यात होता.
डॉक्टरांच्या एका टीमने या व्यक्तीचं ऑपरेशन केलं. त्यांनी Facebook वर पोटातून काढण्यात आलेल्या मोबाईलचा फोटोही शेअर केला आहे. एंडोस्कोपीद्वारे मोबाईल फोन बाहेर काढण्यात आला. याधीही एका 34 वर्षीय व्यक्तीने नशेत असताना फोन गिळला होता. तो त्याच्या घशातच अडकल्याची घटना घडली होती.