उत्तर अटलांटिक महासागरातील (North Atlantic Ocean) हवामान बदलाचा (climate change) खोल महासागरावर काय परिणाम होत आहे, याचा अभ्यास करण्यात आला. पृथ्वीवर पसरलेल्या अतिरिक्त आणि अधिक उष्णतेच्या वितरणाचा सागरी जलावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला आहे. असं आढळून आलं आहे की, मानवी क्रियाकलापांमुळे तयार होणारी पृथ्वीवरील 90 टक्के उष्णता महासागरांमध्ये जाते. याच्यामुळे महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान वाढतं आणि पाण्याच्या प्रवाहाद्वारे ही उष्णता खोल महासागरात जाऊन पोहोचते. यामुळे महासागर उबदार बनत आहेत.
या अभ्यासात खोल महासागरांच्या खाली 700 मीटरपर्यंत आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे. या अभ्यासाच्या आधारे, अधिक उष्णतेमुळे पुढील 50 वर्षांत महासागरातील एवढ्या खोल भागातील तापमान 0.2 डिग्री सेल्सियसने वाढेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. या अभ्यासात, संशोधकांनी उत्तर अटलांटिक महासागरातील खोलीनुसार तापमानाच्या वितरणाचंही मूल्यांकन केलं आणि असं आढळलं की जगभरात तयार होत असलेली उष्णता जास्त प्रमाणात खोलपर्यंत पोहोचली आहे. यामुळे असं लक्षात आलं की, हवामान बदल (climate change) आणि ग्लोबल वार्मिंगच्या (Global warming) अभ्यासात खोल महासागरांचा समावेश करावा लागेल. (सर्व प्रतिकात्मक फोटो: shutterstock)
उत्तर अटलांटिक महासागराच्या (North Atlantic Ocean) उपउष्णकटिबंधीय प्रदेशात, (Subtropical Region) खोल महासागरात भरपूर अतिरिक्त ऊर्जा साठवली जाते. मानवाने निर्माण केलेली 90 टक्के उष्णता (Warming) महासागरांनी शोषली आहे. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, उत्तर अटलांटिकच्या उपोष्णकटिबंधीय प्रदेशात, म्हणजे 25 अंश उत्तर अक्षांशामध्ये खोल समुद्रात 62 टक्के तापमानवाढ झाली आहे.
एक्सेटर युनिव्हर्सिटी आणि ब्रेस्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी असा अंदाज वर्तवलाय की, पुढील 50 वर्षांत खोल समुद्र 0.2 अंश सेल्सिअसने आणखी गरम होईल. महासागरांच्या तापमानवाढीचे अनेक परिणाम होतील. ज्यात समुद्राची वाढती पातळी, पर्यावरणातील बदल, प्रवाह आणि त्यांचं रसायनशास्त्र, डीऑक्सीजनेशन (De oxygenation) यांचा समावेश असेल.
एक्सेटर युनिव्हर्सिटीचे डॉ. मारियो जे मसाया म्हणाले, “आपल्या ग्रहावर (Earth) जसजशी तापमानवाढ होत आहे, तसतसं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की, महासागर अतिरिक्त उष्णता घेत आहेत आणि ती पाण्याच्या पृष्ठभागावरून स्वतःच्या आत घेत आहेत आणि खोलपर्यंत ही उष्णता पोहोचत आहे. हे लक्षात ठेवावं लागेल की, पृथ्वीवरील उर्जा असमतोल वाढीचा अंदाज लावताना आपल्याला खोल महासागरांचाही समावेश करावा लागेल. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
मसाया म्हणाले, "हे देखील लक्षात ठेवावं लागेल की, या उष्णतेचा एक मोठा भाग (Excess Heat) खोल महासागरांमध्ये (Deep Oceans) असतो. आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, विविध भागात महासागरातील प्रवाह कसे बदलले आहेत. आम्हाला आढळलं की, हे पुनर्वितरण उत्तर अटलांटिकच्या तापमानवाढीचं एक प्रमुख कारण आहे. "
संशोधकांनी अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग सर्कुलेशन (AMOC) चा अभ्यास केला. AMOC हा कन्व्हेयर बेल्टसारखा आहे. याच्यामुळे उष्ण कटिबंधातून उबदार पाणी उत्तरेकडं जातं. जिथं खाली खोल समुद्रात थंड आणि जास्त घनता असलेलं पाणी असतं आणि हळूहळू ते दक्षिणेकडे सरकतं. या तपासणीचे परिणाम AMOC द्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या स्थानावर हस्तांतरित केलेल्या उष्णतेचं महत्त्व अधोरेखित करतात.
डॉ. मसाया म्हणतात की, दक्षिण गोलार्धातील महासागरातून येणारी अधिक उष्णता उत्तर अटलांटिकसाठी महत्त्वाची ठरत आहे. ती आता एकूण अतिरिक्त उष्णतेपैकी एक तृतीयांश आहे. या अभ्यासात, संशोधकांनी तापमानाच्या नोंदी आणि ट्रेसर म्हणून रासायनिक पदार्थांचा वापर केला, ज्याचा वापर पूर्वी समुद्रातील बदलांचा मागोवा घेण्यासाठी केला गेला होता.