बेंगळुरू, 18 डिसेंबर : टोयोटा किर्लोस्कर मोटर मॅनेजमेंट (toyota kirloskar) आणि कर्मचारी यूनियनमध्ये गतिरोध कायम आहे. मॅनेजमेंटविरोधात कर्मचारी 9 नोव्हेंबरपासून संपावर आहेत. प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांना चांगले वातावरण दिले जावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरचा हा प्लांट कर्नाटकातील बिदादीमध्ये (Bidadi) आहे. प्लांट राजधानी बेंगळुरूच्या जवळ असूनही सरकार त्यांच्या समस्या गांभीर्याने घेत नसल्याचा कर्मचारी यूनियनचा आरोप आहे. या फॅक्टरीमध्ये टोयोटा, इनोवा आणि फॉर्चूनरसारख्या महगड्या गाड्या तयार केल्या जातात. प्लांटमध्ये कर्मचारी कायम कामाच्या दबावाखाली असतात. यापूर्वी प्लांटमध्ये दरवर्षी 80 हजार कार बनवण्याचं टार्गेट होतं. आता हे टार्गेट वाढवून 1 लाख करण्यात आलं आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या संख्येत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. म्हणजे आधी जे कर्मचारी होते, त्यांच्याकडूनच आता अधिकचं काम करून घेतलं जात असल्याचं, यूनियन कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. एका कर्मचाऱ्याने उदाहरण देताना सांगितलं की, सध्या 3 मिनिटांत एक इनोवा असेम्बल केली जाते. आता प्रत्येक 2.5 मिनिटाला इनोवा तयार होते आहे. या प्लांटमध्ये कर्मचारी 98 टक्क्यांपर्यंत प्रोडक्शन देतात, असं असूनही कर्मचाऱ्यांवर कामचोरीचा आरोप लावला जात असल्याचं, यूनियनचं म्हणणं आहे.
नोव्हेंबरमध्ये काम ठप्प केल्यानंतर आता, डिसेंबरमध्ये कर्नाटकातील बिदादी प्लांटमध्ये काही कर्मचाऱ्यांसह प्रोडक्शन सुरू करण्यात आलं आहे. यूनियनचं म्हणणं आहे की, त्यांना 3500 कर्माचाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यापैकी अधिकतर कर्मचारी संपावर आहेत, जे कंपनीच्या बाहेर संपावर बसून न्यायाची मागणी करत आहेत. प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांसाठी चांगलं वातावरण असणं गरजेचं असल्याचं यूनियनचं म्हणणं आहे. एका कर्मचाऱ्याने कंपनीवर असा आरोप केला की, अनावश्यक त्रास देण्यासाठी पगारात कपात केली जाते, सलग 2 ते 3 तास काम केल्यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घेतल्यासही पगार कपात केली जाते. सलग 30 दिवस ड्यूटी करूनही सॅलरी स्पिपमध्ये 27 वर्किंग डे दाखवले जातात. म्हणजे 3 दिवसांचा पगार कापला जातो.
यूनियनने दिलेल्या माहितीनुसार, प्लांटमध्ये कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरावरही बॅन आहे. मोबाईल वापरल्यास, फोन जप्त केला जातो. आतापर्यंत वेगवेगळी कारणं देऊन 60 कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे. कर्नाटक सरकारने हे प्रकरण सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. परंतु अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
दरम्यान, कर्नाटकचे कामगार मंत्री शिवराम हेब्बर यांनी प्लांटमध्ये सध्या 1100 कामगार काम करत असल्याचं सांगितलं. यूनियन आणि मॅनेजमेंट दोघांची चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप यावर मधला मार्ग काढण्यात आला नसल्याचंही ते म्हणाले. यूनियन त्यांच्या 60 सस्पेंड कर्मचाऱ्यांना पुन्हा घेण्यासाठी अडले आहेत. मात्र याप्रकरणी टोयोटा किर्लोस्करकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.