नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : अनेक फीचर्स असणाऱ्या स्मार्ट वॉचचा (Smart Watch) वापर आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बाजारात अनेक कंपन्यांची स्मार्ट वॉचेस उपलब्ध आहेत. हे स्मार्ट वॉच तुमच्या आरोग्याची (Health) काळजीही घेतं. तुम्ही रोज पायी किती चाललात, किती कॅलरी खर्च झाल्या, हृदयाचे ठोके, रक्तदाब किती आहे याची माहिती यात मिळते. अॅपलचं स्मार्ट वॉच (Apple Smart Watch) मात्र यापेक्षा थोडं वेगळं आहे. यातील एका खास फीचरमुळे अनेकांचा जीव वाचला (Life Saved) आहे. अॅपल वॉचमुळे (Apple Watch) एका 25 वर्षीय तरुणाचा जीव वाचल्याची घटना नुकतीच अमेरिकेत घडली आहे. या आधीही अॅपल वॉचमुळे अनेकांचा जीव वाचल्याच्या घटना घडल्या आहेत. अॅपल वॉचमध्ये फॉल डिटेक्शन (Fall Detection) नावाचं फीचर आहे. यामध्ये तुमच्या शारीरिक स्थितीवर देखरेख केली जाते. त्यात काही बिघाड झाल्यास प्रतिसादासाठी काही सेकांदाचा वेळ दिला जातो, तेवढ्या वेळात प्रतिसाद मिळाला नाही, तर आपोआप 911 या आपत्कालीन नंबरवर मेसेज केला जातो. 2018 मध्ये सादर करण्यात आलेल्या वॉच सीरीज 4 मध्ये पहिल्यांदा हे फॉल डिटेक्शन फीचर लाँच करण्यात आलं होतं. या फीचरमुळे अमेरिकेतील (USA) लॉंग आयलंड (Long Island) इथल्या ब्रॅंडन स्नेडियर नावाच्या 25 वर्षीय तरुणाला जीवनदान मिळालं आहे. अनेक दिवस ओटीपोटात दुखत असल्यानं ब्रॅंडन स्नेडियर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथं टॉयलेटमध्ये गेला असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यावेळी मदतीला धावून आलं ते त्याचं अॅपल वॉच. अॅपल वॉचने त्याच्या शारीरिक स्थितीतील बदलाची तात्काळ दखल घेत त्याला इमर्जन्सी मेसेज पाठवला, पण 45 सेकंदात त्याचा प्रतिसाद आला नाही. तेव्हा ताबडतोब त्याच्या संपर्कातील क्रमांकासह 911 या आपत्कालीन क्रमांकावर अलर्ट पाठवला. त्यामुळे ब्रॅंडनला तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली आणि त्याचा जीव वाचला.
जमिनीवर जोरात आपटल्याने ब्रॅंडनच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता. तसंच त्याच्या डोक्याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आणि जखमा झाल्या असल्याचं सीटी स्कॅनमध्ये (CT Scan) दिसून आलं. ताबडतोब त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर 4 दिवसांनी ब्रँडन शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने सांगितलं की, बाथरूममध्ये तो आपले हात धुवत असताना अचानक त्याला आपल्याला काहीतरी होतेय याची जाणीव झाली, पण त्याला काही समजण्याच्या आतच तो जमिनीवर पडला. त्यावेळी त्याचं डोकं जोरात कुठेतरी आदळलं. अॅपल वॉचने आपत्कालीन संदेश पाठवला नसता, तर कदाचित ब्रँडन जिवंत राहिला नसता. त्याचा जीव वाचवण्याचं सगळं श्रेय त्याने अॅपल वॉचला दिलं आहे.
याआधीही अॅपल वॉचमुळे अनेकांचा जीव वाचल्याच्या घटना घडल्या आहेत. एका तरुणाला त्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याची सूचना देण्यात आली आणि त्याला हृदय विकाराच्या झटक्यापासून वाचवण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर हे स्पष्ट झालं की, अॅपल वॉचने योग्य वेळी सूचना दिली नसती, तर त्या तरुणाला गंभीर संकटाला सामोरं जावं लागलं असतं.