ट्रेविस हेडच्या फलंदाजीसमोर भारतीय गोलंदाज निष्प्रभ
लंडन, 08 जून : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सुरू आहे. लंडनमधील ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवशी सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लवकर तंबूत धाडलं. मात्र त्यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने गोलंदाजांची धुलाई केली. दोघांनी द्विशतकी भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतला फलंदाज ट्रेविस हेडने शतक झळकावलं असून तो दिवस अखेर 146 धावांवर नाबाद राहिला. त्याने 156 चेंडूत 22 चौकार आणि एक षटकार मारला. त्याने स्टिव्ह स्मिथसोबत 251 धावांची भागिदारी केली. भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद शमी यांनी आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. 2023च्या आयपीएलमध्ये शमीने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. शमी आणि सिराज दोघेही फॉर्ममध्ये होते. पण ट्रेविस हेडसमोर त्यांची गोलंदाजी निष्प्रभ ठरली. आता दुसऱ्या दिवशी ट्रेविस हेडला बाद करण्यात टीम इंडियाला यश मिळणार का हे पाहावं लागेल. WTC Final : टीम इंडियाने केल्या चुका; गावस्कर, गांगुली नाराज तर शास्त्री गुरुजींनी दिला सल्ला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची डोकेदुखी ठरणारा ट्रेविस हेड आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला होता. त्याने 2 कोटी बेस प्राइजसह नाव नोंदवलं होतं. पण त्याला घेण्यासाठी कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. ट्रेविस हेड हा पार्ट टाइम ऑफ स्पिनरसुद्धा आहे. याआधीही तो आयपीएल खेळला आहे. 10 सामन्यात त्याला 205 धावाच करता आल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने ट्रेविस हेडच्या शतकाच्या आणि स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या दिवशी 3 बाद 327 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड आणि स्मिथ नाबाद असून स्टिव स्मिथ शतकाच्या जवळ आहे. त्याच्या नाबाद 95 धावा झाल्या आहेत. त्याने ट्रेविस हेडसोबत 251 धावांची भागिदारी केलीय. या दोघांशिवाय डेव्हिड वॉर्नरने 43 धावा केल्या. तर लॅब्युशेन 23 धावा केल्या. उस्मान ख्वाजा शून्यावर बाद झाला.