'सिनियर खेळाडूंचा आदर करणं शिक' त्या कृतीवरून नेटकऱ्यांनी मोहम्मद सिराजला झापलं
मुंबई, 8 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जात आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर हा सामना सुरु असून या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 100 ओव्हरमध्ये 6 विकेट्स देऊन 388 धावा केल्या. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत असताना भारताचा गोलंदाज मोहम्मद सिराज याने केलेल्या एका कृतीमुळे सध्या त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजानी 3 विकेट्स गमावून 327 धावा केल्या. यावेळी भारताकडून मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवशी खेळ सुरु होताच ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने शतक पूर्ण केले, तर ट्रेव्हिस हेडने देखील त्याच्या वैयक्तिक 150 धावा पूर्ण केल्या. WTC Final : टीम इंडियाने केल्या चुका; गावस्कर, गांगुली नाराज तर शास्त्री गुरुजींनी दिला सल्ला पहिल्या डावात गोलंदाज मोहम्मद सिराज 84 वी ओव्हर टाकत होता. यावेळी त्याने टाकलेल्या सलग दोन चेंडूंवर स्टीव्ह स्मिथने लागोपाठ 2 चौकार लगावले. तर सिराज पुढचा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेत असताना क्रीजवर असलेल्या स्टीव्ह स्मिथने त्याला थांबण्याचा इशारा दिला. परंतु सिराजच्या अग्रेशनमध्ये येऊन थांबण्याचा इशारा दिलेला असताना देखील स्टंप्सवर बॉल फेकला.
सिराजच्या याकृतीमुळे स्टीव्ह स्मिथ काहीसा चिडलेला दिसला. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी सिराजच्या या कृतीविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. एका युझरने मोहम्मद सिराजला सिनियर खेळाडूंचा आदर करण्याचा सल्ला देत त्याची कानउघडणी केली आहे.