WTC फायनलमध्ये टीम इंडिया फॉलो ऑनच्या छायेत?
मुंबई, 8 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळवली जात आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर हा सामना सुरु असून यात ऑस्ट्रेलियाने प्रथम बॅटिंग करून 469 धावांवर ऑल आउट होत टीम इंडियाला तगडे आव्हान दिले. यानंतर मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात खराब झाली आणि सुरुवातीच्या काही ओव्हरमध्येच टीम इंडियाने 4 विकेट्स गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया आता फॉलो ऑनच्या छायेत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी 3 विकेट्स गमावून 327 धावा केल्या. तर दुसऱ्या दिवशी भारताने उर्वरित 7 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला 469 धावांवर रोखले. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 163 धावा केल्या, तर स्टीव्ह स्मिथने 121 धावा करत त्याची टेस्ट क्रिकेटमधील 31 वे शतक ठोकले. WTC Final : ‘सिनियर खेळाडूंचा आदर करणं शिक’ त्या कृतीवरून नेटकऱ्यांनी मोहम्मद सिराजला झापलं टीम इंडियासमोर 469 धावांचे आव्हान असताना कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे फलंदाजीसाठी मैदानात आले. परंतु सहाव्या ओव्हरमध्येच रोहित शर्माची विकेट पडली. रोहित 15 धावा करून बाद झाला तर पुढच्याच ओव्हरला 13 धावा करून शुभमन गिल देखील बोल्ड झाला. यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे टीम इंडियाला सावरतील अशी शक्यता असतानाच पुजारा देखील 14 धावा करून बाद झाला. तर त्यानंतर विराट कोहली देखी 14 धावांवर झेल बाद झाला. अशाप्रकारे केवळ 72 धावांवर टीम इंडियाने चार विकेट्स गमावल्या.
समोर धावांचा मोठा डोंगर असताना टीम इंडियाच्या महत्वाच्या विकेट्स फार लवकर गेल्याने टीम इंडिया आता फॉलो ऑनच्या छायेत आहे. यापुढेही अशाच प्रकारे टीम इंडियाच्या विकेट्स जात राहिल्यास ऑल आउटनंतर ऑस्ट्रेलिया टीम इंडियाला पुन्हा फलंदाजीचे आव्हान देऊ शकते. टेस्ट क्रिकेटचा आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेतला तर फॉलो ऑन मिळालेल्या टीम फार क्वचितच सामना जिंकलेल्या आहेत. तेव्हा विकेट वाचवून धाव संख्येत देखील गती मिळवणं हे टीम इंडियासमोर आव्हान असणार आहे.