"मी निघून जाणार होते" अंतिम सामन्यातील वादग्रस्त नो बॉलवर शफाली वर्माच वक्तव्य
मुंबई, 27 मार्च : भारतात आयोजित करण्यात आलेल्या महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये पारपडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला असून पहिल्या महिला आयपीएलचे विजेतेपद पटकावले. महिला आयपीएलमधील अंतिम सामना जिंकून हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने विजेत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. परंतु या सामन्या दरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाज शफाली वर्मा हिला टाकलेला एक बॉल वादग्रस्त ठरला. ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये महिला आयपीएलचा अंतिम सामना पारपडला. या सामन्यात टॉस जिंकून दिल्ली संघ मैदानात फलंदाजीसाठी उतरला. यावेळी दिल्लीकडून सलामीसाठी कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा हे दोघे मैदानात आले. दुसऱ्या षटकात मुंबईची वेगवान गोलंदाज इस्सी वाँगने शफाली वर्मा हिला बाद केले. इस्सीने टाकलेल्या चेंडूवर शफाली शटकार ठोकण्याच्या नादात ती झेलबाद झाली. परंतु याचवेळी नॉन स्ट्राईकला उभी असलेली मेग लॅनिंग हिला इस्सी वोंगच्या बॉलवर अंपायरने शफालीला आऊट दिल्याने तिला आश्चर्य वाटले. तिने अंपायरकडे नो-बॉलची मागणी केली. बॉल शफालीच्या कमरेच्या वर गेल्याचे दिसत होते. रिप्लेमध्ये दाखवल्यावर चेंडूची रेषा विकेटच्या वर होती. अशा स्थितीत चाहत्यांना हा नो-बॉल वाटला, परंतु तिसर्या अंपायरनी तसा विचार न करता शफालीला मैदानाबाहेर बाहेर जायला सांगितले.
शफालीबाबत दिलेल्या निर्णयामुळे कर्णधार लॅनिंग नाखुश दिसली. तिने तिसऱ्या अंपायरच्या निर्णयानंतरही मैदानावरील अंपायरशी याबाबत बराच वेळ वाद घातला. परंतु शेवटी शेफालीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले आणि ती अंतिम सामन्यात केवळ 11 धावा करून शकली. अंपायरने शफाली वर्माच्या बाबतीत चुकीचा निर्णय दिला असे समजून दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांनी देखील महिला आयपीएलच्या अंपायर्सना ट्रोल केले. ट्विटरवर चाहत्यांनी याबाबत संताप व्यक्त केला.
सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाल्यानंतर माजी क्रिकेटर आणि कॉमेंट्रेटर आकाश चोप्राने या नो बॉलच्या निर्णयावर शफालीला प्रश्न विचारला. तेव्हा शफाली म्हणाली, “मी तर थांबणारच नव्हते, निघून जाणार होते मात्र कर्णधार मेग लॅनिंगने अडवले होते. तो नो बॉल होता की नव्हता हा निर्णय सर्वस्वी पंचाचा होता जो मला मान्य होता”. यावर आकाश चोप्रा म्हणाला की, “मला वाटत होता तो नो-बॉल होता आणि कोमेंट्री करताना मी हे बोललो देखील होतो. यावर शफाली हसत म्हणाली की, “तुम्ही हे मैदानात येऊन सांगायला हवे होते”. मुंबईने अंतिम सामन्यात दिल्लीने विजयासाठी दिलेलं 132 धावांच आव्हान पूर्ण केलं आणि महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनचे विजेतेपद पटकावले.