नवी दिल्ली, 25 डिसेंबर : भारताची महिला कुस्तीपट्टू आणि कॉमनवेल्थ गेम्स - 2010 मध्ये सुवर्णपदक विजेती गीता फोगट आई झाली आहे. गीताने मंगळवारी मुलाला जन्म दिला. चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने ही माहिती दिली. गीता फोगटने या फोटोला एक कॅप्शनही दिला आहे. गीताने म्हटलं की, बाळा, तुझं या जगात स्वागत आहे. यासह तिने मुलासाठी शुभाशिर्वादही मागितले आहेत. मुलाला जन्म देण्याचा अनुभव वर्णन करता येणार नाही असंही तिनं म्हटलं आहे. गीताची बहीण आणि दंगल गर्ल बबीता फोगटनेसुद्धा मुलाच्या जन्मानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. तिने म्हटलं की, तू आई झाल्याबद्दल अभिनंदन. मुलाला दिर्घायुष्य लाभो आणि आयुष्य आनंदात जावो.
नोव्हेंबर 2016 मध्ये गीताने कुस्तीपटू पवन कुमारशी लग्न केले होते. गीताने याआधी इन्स्टाग्रामवर तिचा प्रेग्नन्सी फोटो शेअर करताना लिहिले होते की, ‘जेव्हा तुमच्यात नवीन जीवन येते तेव्हा तुम्हाला आई होण्याचा आनंद होतो. जेव्हा त्याची पहिली धडधड ऐकू येते आणि पोटातील किक की ती कधीही एकटी नसल्याची आठवते आईला होते. जोपर्यंत हे तुमच्यात होत नाही तोपर्यंत तुम्हाला आयुष्याचा अर्थ नीटपणे उमगत नाही.’ काही काळ गीता कुस्तीपासून दूर होती. गीताच्या बायोपिक ‘दंगल’ मध्ये आमिर खान आणि फातिमा सना शेख दिसले होते. हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला. या चित्रपटात गीताची भूमिका फातिमा सना शेखने केली होती, तर बालपणीची गीता फोगट झयरा वसीमने साकारली होती. आमिर खान यांनी गीताचे वडील आणि प्रशिक्षक महावीर सिंग फोगट यांची भूमिका केली होती.