सचिन तेंडुलकरने महिला आयपीएलच्या लिलावानंतर शेअर केला खास व्हिडीओ
मुंबई, 14 फेब्रुवारी : पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही क्रिकेटमध्ये संधी आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने महिला प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. भारतात प्रथमच होणाऱ्या महिला प्रीमियर लीगची लिलाव प्रक्रिया काल मुंबई येथे पारपडली. या लिलाव प्रक्रियेत एकाहून एक सरस महिला खेळाडूंना विकत घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने लिलावात सर्वाधिक बोली लावून स्मृती मानधना हिला खरेदी केले. तसेच भारताच्या अनेक महिला खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली. काल झालेल्या महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शननंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने एक खास व्हिडीओ ट्विट केला.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर देखील बराच सक्रिय असतो. मुंबईत पारपडलेल्या महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शननंतर त्याने ट्विटरवर एका गावात मुली क्रिकेट खेळत असतानाच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओत गावातील मुली क्रिकेट खेळताना तुफान फलंदाजी करीत असलयाचे दिसते. संबंधित व्हिडिओवर सचिनने कॅप्शन देत लिहिले, “कालच तर लिलाव झाला आणि आजपासून मॅचला देखील सुरुवात? क्या बात हे. तुमच्या बॅटिंगचा मी आनंद घेत आहे”.
4 मार्च ते 26 मार्च या कालावधीत महिला प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. काल पारपडलेल्या लिलावात 409 महिला खेळाडूंचा सहभाग होता. महिलांच्या आयपीएल लिलावात सर्वोच्च बेस किंमत ही 50 लाख रुपये होती.