मुंबई, 12 जुलै : इंग्लंडचा युरो कपच्या (Euro Cup) फायनलमध्ये इटलीकडून पराभव झाला, यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. फायनलमध्ये इटलीने इंग्लंडचा (England vs Italy) पेनल्टी शूट-आऊटमध्ये 3-2 ने पराभव केला. फुलटाईमपर्यंत मॅचचा स्कोअर 1-1 ने बरोबरीत होता. इटलीने दुसऱ्यांदा युरो कपचा किताब जिंकला. तर दुसरीकडे इंग्लंडला 55 वर्षात एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. 1966 साली इंग्लंडने शेवटचा फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. इंग्लंडच्या या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने त्यांचे मॅनेजर गारेथ साऊथगेट (Gareth Southgate) याची तुलना चक दे इंडिया मधल्या शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) केली. चक दे इंडिया या चित्रपटात शाहरुख खानने कबीर खानची (Kabir Khan) भूमिका साकारली. या हिट चित्रपटात शाहरुख भारतीय महिला हॉकी टीमचा प्रशिक्षक होता, तसंच चित्रपटामध्ये भारतीय महिला टीम हॉकी वर्ल्ड कप जिंकताना दाखवण्यात आली आहे.
कबीर खान जेव्हा खेळाडू होता, तेव्हा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव होतो. त्यानंतर कबीर खानवर टीकेची झोड उठते आणि त्याला गद्दार म्हणून संबोधलं जातं. यानंतर कबीर खान महिला टीमचा प्रशिक्षक बनतो आणि वर्ल्ड कप जिंकण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करतो, असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. इंग्लंड टीमचे मॅनेजर साऊथगेट यांची कहाणीही अशीच आहे. 1996 साली साऊथगेट पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाले, दुर्दैवाने 2021 सालीही इंग्लंड टीमचा कोच असताना त्यांना युरो कप जिंकण्यात अपयश आलं. जाफरने ट्वीटच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘फक्त हा बॉलिवूड चित्रपट असता तर’. याचसोबत त्याने हृदय तुटल्याचा इमोजीही पोस्ट केला.