पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या 2 आरोपींचा अटक
मुंबई, 18 फेब्रुवारी : भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर गुरुवारी रात्री काही तरुणांच्या समूहाने हल्ला केला. पृथ्वी शॉने सेल्फी देण्यास नकार दिल्यामुळे हा प्रकार घडला असून यात तरुणांनी पृथ्वी बसलेल्या गाडीवर हल्ला करून त्याची काच फोडली. याविषयी पृथ्वीने ओशिवारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून यात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 16 फेब्रुवारीच्या रात्री पृथ्वी शॉ आपल्या मित्रासोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. याचवेळी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर असलेली सपना गिल आणि तिचे मित्र पृथ्वी शॉजवळ येऊन फोटो काढायला लागले. तेव्हा पृथ्वी शॉने त्यांना फोटो दिला मात्र त्यानंतर सपना गिल आणि तिचे मित्र वारंवार पृथ्वी शॉचे फोटो काढत होते. यावेळी पृथ्वीने हॉटेल मालकाला फोन करून यासर्वांना बाहेर काढण्यास सांगितले. याचाच राग मनात ठेऊन बाहेर पडलेल्या तरुणांच्या समूहाने पृथ्वी शॉ बसलेल्या गाडीला घेराव घालून त्याच्यावर हल्ला केला. हे ही वाचा : क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मारहाण करणारी सपना गिल नेमकी आहे तरी कोण?
सुदैवाने यात पृथ्वीला कोणतीही दुखापत झाली नाही. परंतु यात गाडीचे बरेच नुकसान झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात पृथ्वीला मारण्यासाठी येणाऱ्या सपना गिल हिला तो रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. या घटनेनंतर पृथ्वीने पोलिसात तक्रार दाखल केली.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी रुद्रा आणि साहिल या दोन तरुणांना अटक केली असून यादोघांवर पृथ्वीने गाडीवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. मुंबई पोलीस या गुन्ह्यातील इतर आरोपींच्या देखील शोधात आहेत.