JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics : दीपक पुनियाच्या सामन्यानंतर मोठा वाद, कोचला काढलं बाहेर

Tokyo Olympics : दीपक पुनियाच्या सामन्यानंतर मोठा वाद, कोचला काढलं बाहेर

भारताचा कुस्तीपटू दीपक पुनिया (Deepak Punia) याचे परदेशी प्रशिक्षक मोराड गेड्रोव्ह (Morad Guiderov) यांना ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) बाहेर करण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

टोकयो, 6 ऑगस्ट : भारताचा कुस्तीपटू दीपक पुनिया (Deepak Punia) याचे परदेशी प्रशिक्षक मोराड गेड्रोव्ह (Morad Guiderov)  यांना ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) बाहेर करण्यात आलं आहे. ब्रॉन्झ मेडलसाठीच्या मॅचवेळी दीपकच्या पराभवानंतर मोराड रेफ्रीच्या रूममध्ये गेले आणि त्यांनी मुकाबल्याचा निर्णय देणाऱ्या रेफरीवर हल्ला केला. दीपक पुनियाचा 86 किलो वर्गाच्या सामन्यात सॅन मॅरिनोच्या नाजेम मायलेस एमिने याने पराभव केला. ब्रॉन्झ मेडलसाठीचा हा सामना होता. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) याची तक्रार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे (IOC) केली. तसंच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडे (WFI) मोराड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने मोराड यांना इशारा देऊन सोडून दिलं होतं. यानंतर युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाला तुम्ही काय कारवाई केली, असा प्रश्न विचारला. यानंतर भारतीय फेडरेशनने आम्ही मोराड यांचं निलंबन केल्याचं सांगितलं. मोराड यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, कारण त्यांनी याआधीही असे प्रकार केले आहेत, असं युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला सांगितलं. मोराड गेड्रोव यांनी बिजिंग ऑलिम्पिकमध्ये 74 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. मोराड यांना 2004 अथेन्स ऑलिम्पिकदरम्यान डिसक्वालिफाय करण्यात आलं होतं. क्वार्टर फायनलच्या सामन्यात पराभवानंतर मोराड यांनी आपल्या विरोधी खेळाडूवर हल्ला केला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने गेड्रोव्ह यांची मान्यता त्वरित संपवायला सांगितली आहे, तसंच याबाबत भारतालाही माहिती देण्यात आली आहे. गेड्रोव यांना ताबडतोब ऑलिम्पिक व्हिलेज सोडण्याचं सांगण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून आम्हाला पत्र मिळालं, यामध्ये गंभीर अनुशासन मोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे, असं टोकयोमधल्या भारतीय अधिकाऱ्याने सांगितलं. दीपक पुनिया सॅन मॅरिनोच्या नाजेम मायलेस एमिनेविरुद्ध 4-2 ने हरला होता. 6 मिनिटाच्या मुकाबल्यामध्ये दीपक 5 मिनीट 40 सेकंद 2-1 ने पुढे होता, पण नंतर नाजेमने सिंगल लेग अॅटेककरून दोन पॉईंट घेतले आणि दीपकला मागे टाकलं. भारतीय दलाने या निर्णयाविरुद्ध अपील केली केली, पण हे अपील विरोधात गेलं. यामुळे विरोधी पैलवानाला 1 पॉईंट आणखी मिळाला आणि त्याने बाऊट 4-2 ने जिंकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या