मुंबई, 1 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताला दुसरं पदक मिळालं आहे. मीराबाई चानूनंतर (Mirabai Chanu) बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने (PV Sindhu) या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलं. सिंधूने चीनच्या बिंग जियाओचा दोन सरळ सेटमध्ये 21-13, 21-15 ने पराभव केला. याआधी शनिवारच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे सिंधूचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं होतं. यानंतर तिला अश्रू अनावर झाले होते, पण सिंधूचे वडील पीव्ही रामाणा (P.V. Ramana) यांनी तिला एक व्हिडिओ पाठवला यानंतर 24 तासांच्या आता सिंधूने इतिहास घडवला. पीव्ही सिंधूने ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर तिच्या वडिलांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘सिंधूचे प्रशिक्षक पार्क यांचे विशेष आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी खूप त्रास सहन केला. देशासाठी तिने मेडल जिंकलं याबद्दल आनंद आहे. लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे, याचंही मला समाधान आहे,’ असं पीव्ही रामाणा म्हणाले. ‘काल झालेल्या पराभवानंतर मी तिच्याशी बोललो. तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. माझ्यासाठी विजय मिळवं, असं मी तिला सांगितलं. बिंग जियाओच्या मॅच बऱ्याच वेळ चालल्या, त्यामुळे आता तिला फार काळ टिकता येणार नाही, असं मी सिंधूला सांगितलं. अभ्यास करण्यासाठी मी तिला काही व्हिडिओदेखील पाठवले. आज तिने आक्रमक खेळ केला,’ असं वक्तव्य सिंधूच्या वडिलांनी केलं. ‘3 तारखेला सिंधू दिल्लीला येणार आहे, तेव्हा मी तिला दिल्लीला घ्यायला जाणार आहे. सिंधूला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पुढच्या ऑलिम्पिकमध्येही ती खेळेल, असा मला विश्वास आहे. खेळावर ती लक्ष केंद्रीत करते, तसंच तिला भूकही आहे. हा खेळ ती एन्जॉय करते,’ असं सिंधूचे वडील म्हणाले. पी.व्ही सिंधू लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला तसंच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी सुशील कुमारने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 2008 साली ब्रॉन्झ मेडल आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. सिंधूने याआधी रियो ऑलिम्पिकमध्ये 2016 साली सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. याआधी शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये सिंधूचा चीनच्या ताई झू यिंगने सिंधूचा 18-21,12 - 21 असा पराभव केला, त्यामुळे तिचं गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं.