टोकयो, 24 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) गोल्ड मेडल जिंकण्याच्या उद्देशानं स्पर्धेत उतरलेल्या भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं (Men’s Hockey Team) सुरुवात विजयानं केली आहे. शेवटपर्यंत रंगलेल्या लढताीमध्ये भारतानं न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. भारतीय टीमनं सुरुवातीच्या पिछाडीनंतर पुनरागमन करत विजय मिळवला. न्यूझीलंडच्या केन रसेलनं 6 व्या मिनिटालाच गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडची ही आघाडी फार टिकली नाही. भारताच्या रुपिंदर पाल सिंहनं 10 मिनिटालाच गोल करत बरोबरी केली. त्यानंतर हरमनप्रीत सिंहनं (Harmanpreet Singh) 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. या आघाडीनंतर भारतीय टीमनं जोरदार खेळ केला. त्यानंतर सात मिनिटांनीच हरमनप्रीतनं दुसरा गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडच्या स्टीफन जेनेसनं 43 व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताची आघाडी कमी केली. शेवटच्या टप्प्यातही न्यूझीलंडनं आक्रमक खेळ करत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या बचाव फळीनं त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत. भारतानं अखेर हा सामना 3-2 नं जिंकला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ही 8 वी लढत होती. त्यामध्ये भारतानं मिळवलेला हा पाचवा विजय आहे. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
चीनला पहिले गोल्ड टोकयो ऑलिम्पिकमधील पहिले गोल्ड मेडल चीननं जिंकले. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच चीनच्या यांग क्विनाननं अंतिम फेरीत 251.8 पॉईंट्ससह गोल्ड मेडल जिंकले. हा ऑलिम्पिक रेकॉर्ड देखील आहे. रशियाच्या अनास्तासिया गालसिनानं सिल्व्हर तर स्वित्झर्लंडच्या नीना क्रिस्टिएननं ब्रॉन्झ मेडल पटकावले. या गटात भारतीय शूटर अपूर्वी चंदेला आणि इलोवेनिल वालारिन या दोघींनी निराशा केली. त्यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.