नवी दिल्ली, 24 जुलै: 23 जुलैपासून जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला म्हणजेच Olympics (Olympics 2020) ला सुरुवात झाली. यंदा जपानच्या टोकियोमध्ये Olympics सुरु आहे. टोकियो (Tokyo 2020) ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदकासह 26 वर्षीय मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) महिलांच्या 49 किलोग्रॅम वेट लिफ्टिंग (weight lifting competition) स्पर्धेत भारताला या ऑलिम्पिकमधील पहिलं मेडल मिळवून दिलं. त्यामुळे भारताला आशा आणि प्रेरणा मिळाली आहे. जगभरातील सर्वस्तरातून मीराबाई चानू हिचं कौतुक होत आहे. त्यात आता मीराबाईंचं अभिनंदन करण्यासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari), वृध्दिमान साहा, अश्विनी वैष्णव यासारख्या देशातील आघाडीच्या व्यक्तींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे. मात्र अभिनव बिंद्रानं (Abhinav Bindra) एक भावनिक पत्र मीराबाई चानूसाठी लिहिलं आहे. 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा अभिनव म्हणाला, " Olympics 2020 मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकल्याबद्दल मिराबाई चानू हीचं हार्दिक अभिनंदन. तू अशी प्रेरणादायक कामगिरी केली आहे जी बर्याच काळासाठी लक्षात ठेवली जाईल आणि पिढ्यांना प्रेरणा देईल." “ही फक्त खेळाची ताकद आहे जी जगातील सर्वच खेळाडूंना एकत्र आणते, त्यांना लढण्याची ताकद देते आणि एकतेच्या भावनेची आठवण करून देते. यामुळेच जगाला नवीन सुपर हिरो मिळतात, त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. या कोरोनच्या कठीण काळात एकीकडे सगळीकडे जगण्याची धडपड सुरु आहे, अशा काळात तुझ्या जिद्द आणि चिकाटी भरलेल्या विजयामुळे आनंद मिळतो.” असंही अभिनव बिंद्रानं पत्रात म्हंटल आहे. काय आहे मीराबाईच्या पहिली प्रतिक्रिया मी हे मेडल देशवासियांना समर्पित करते. त्याचबरोबर माझ्या यशासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानते. मी माझ्या परिवाराची देखील आभारी आहे. विशेषत: माझी आई, जिनं माझ्यासाठी खूप त्याग केला. माझ्यावर विश्वास दाखवला. मला पाठिंबा देण्यासाठी आपले सरकार, क्रीडा मंत्रालय, साई, आयओए, वेटलिफ्टिंग फेडरेशन, रेल्वे, स्पॉनर्स आणि माझ्या मार्केटिंग टीमची देखील मी आभारी आहे. या सर्वांनी या प्रवासात मला सतत पाठिंबा दिला आहे.