JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Pathan Controvercy : जनता उपाशी मरते, दुसरीकडे..., पठाणमधील कपड्यांच्या चर्चेवर रत्ना शाह भडकल्या

Pathan Controvercy : जनता उपाशी मरते, दुसरीकडे..., पठाणमधील कपड्यांच्या चर्चेवर रत्ना शाह भडकल्या

अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

जाहिरात

रत्ना पाठक

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 डिसेंबर : अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. 12 डिसेंबर रोजी या चित्रपटातील पहिलं गाणं, ‘बेशरम रंग’ रिलीज करण्यात आलं. चाहत्यांना हे गाणं आवडलं आहे. मात्र, या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या वेशभूषेमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह काही भाजप नेत्यांनी या गाण्यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी आपलं मत मांडलं आहे. “सध्याच्या सामाजिक-राजकीय वातावरणात हिंदी चित्रपटसृष्टीला नेहमीच द्वेषाचा सामना करावा लागतो. देशातील अनेक नागरिकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. त्या विषयी बोलण्याऐवजी आपल्याकडे कपड्यांबद्दल चर्चा होते हे, दुर्दैव आहे. भविष्यात ही स्थिती बदलेल अशी मला आशा आहे,” असं रत्ना शाह म्हणाल्या आहेत. ‘इंडियन एक्सप्रेस’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रत्ना शाह ‘कच्छ एक्सप्रेस’ या चित्रपटाच्या माध्यमातून गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. विरल शाह दिग्दर्शित चित्रपटामध्ये मानसी पारेख, धर्मेंद्र गोहिल, दर्शील सफारी आणि विराफ पटेल यांच्याही भूमिका आहेत. येत्या 6 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणारा आहे. त्या पूर्वी त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाशी संबधित वादावर भाष्य केलं. हेही वाचा -  Deepika Padukone Bikini Price : बेशरम रंग गाण्यात दीपिका पादुकोणने घातली इतकी महागडी बिकिनी, किंमत वाचून व्हाल थक्क गेल्या काही वर्षांपासून, सोशल मीडियावर हिंदी चित्रपट क्षेत्राला सातत्यानं टीकेचा सामना करावा लागत आहे. काही वेळा लोकांनी रस्त्यांवर उतरूनही विरोध केला आहे. शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं रिलीज झाल्यानंतर हिंदू उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी भेडाघाट आणि मध्य प्रदेशातील जबलपूरमधील नयनरम्य धुआधार धबधबा परिसरात जाऊन निषेध करण्याचा प्रयत्न केला. शाहरुखच्या आगामी डंकी (Dunki) या चित्रपटाचं शूटिंग त्या ठिकाणी होणार असल्याची माहिती मिळाल्यानं विरोधक तिथे पोहचले होते. चित्रपट कलाकारांच्या बाबतीत सोशल मीडियावर क्षुल्लक कारणांवरून चर्चा होते. संपूर्ण चित्रपट क्षेत्र काम करण्यासाठी अयोग्य आहे, असा निष्कर्षही त्यातून अनेकदा काढला जातो. सुमारे चार दशकं चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रत्ना पाठक शाह यांना हे चित्र बघून वाईट वाटतं का? असे विचारलं असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. हेही वाचा -  Deepika Padukone FIFA : ‘पठाण’चा वाद सुरू असतानाच FIFA च्या ट्रॉफीसह दिसली दीपिका; Photo VIRAL “सध्या काय सुरू आहे, याबाबत मी ऐकलं आहे. सामान्य माणसाच्या किंवा काही निवडक व्यक्तींच्या मनात कलावंतांचं अवमूल्यन होत आहे. याबाबत दुमत नाही. हाच घटक काही मुद्द्यांना वादग्रस्त ठरवण्यात कारणीभूत ठरतो आहे. मला प्रकर्षानं वाटतं की, कोणत्याही समाजासाठी ही चांगली गोष्ट नाही. कला आणि क्राफ्टला आपली पूर्ण क्षमता सिद्ध करण्यासाठी स्वातंत्र्याची गरज आहे. पण, दिवसेंदिवस परिस्थिती अवघड होत चालली आहे,” असं रत्ना शाह म्हणाल्या. “अलीकडच्या काळात हिंदी चित्रपट इंडस्ट्रीनं फारच सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार कलाकृती निर्माण केलेल्या आहेत, असं नाही. कलाकारांनाही वाटतं की, कामचलाऊ काम करून तग धरता येईल. पण, म्हणून विशिष्ट लेबल लावून चित्रपट आणि कलाकारांना नावं ठेवणं दुःखदायक आहे. आपण असा कोणताही कंटेंट तयार केलेला नाही जो कोणत्याही प्रकारच्या कौतुकास पात्र आहे. आपण तयार केलेली बरीच सामग्री खूपच भयानक किंवा अगदी सामान्य दर्जाची आहे. पण, चित्रपट बनवताना होणारी मेहनत खूप मोठी आहे. चित्रपट आणि कलाकारांचं इतकं सोपं आणि सहज ब्रँडिंग ही फार खेदाची बाब आहे. त्यासाठी किती वेळ वाया घातला जातो. आपल्याकडे विचार करण्यासारख्या इतर गोष्टी नाहीत का?” असा प्रश्नही रत्ना शाह यांनी उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या, “आपल्या देशातील स्थिती बघा. साथीच्या रोगाने आपल्या देशातील लहान-मोठे उत्पादक डबघाईला आले आहेत. अनेकांना खायला पुरेसं अन्न नाही. आपण मात्र, कोण कसे कपडे घालत आहे यावर गोंधळ घालत बसलो आहोत.” जेव्हा एखादी व्यक्ती काय म्हणते किंवा कलाकारानं परिधान केलेल्या पोशाखाचा रंग हा राष्ट्रीय विषय बनतो, तेव्हा एक कलाकार म्हणून काय वाटतं? असं विचारलं असता रत्ना शाह म्हणाल्या, “मी असे म्हणेन की, आपण खूप मूर्खपणाच्या काळात जगत आहोत. जर अशा विचित्र गोष्टींचा प्राधान्यानं विचार होत असेल तर मला त्याबद्दल बोलण्यात रसही नाही. पण, मला आशा आहे की भारतात बरेच समजूतदार लोक आहेत. ते नक्की पुढे येतील. कारण, सध्या दिसणारी बहिष्काराची भावना टिकणारी नाही. मला असं वाटतं की, माणूस एका मर्यादेपलीकडे द्वेष करू शकत नाहीत. मी तो दिवस येण्याची वाट पाहत आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या