रायपूर, 18 मार्च : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) आक्रमक फलंदाजीचं वादळ बुधवारी पुन्हा एकदा अनुभवयाला मिळाले. इंडिया लिजेंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लिजेंड्स (India legends vs West Indies legends) यांच्यात रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेची (Road Safety World Series 2021) पहिली सेमी फायनल झाली. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं त्याच्या जुन्या आठवणी जागवल्या. सचिननं फक्त 42 बॉलमध्ये 65 रन काढले. यामध्ये 6 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. यावेळी सचिनच्या जुन्या फटकेबाजीचा आनंद क्रिकेट फॅन्सना घेता आला. सचिन तेंडुलकरच्या फटकेबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सचिन तेंडुलकर संपूर्ण भरात असताना 2003 साली त्याने इंग्लंडचा फास्ट बॉलर अॅण्ड्रयू कॅडीक (Andrew Caddik) याच्या विरुद्ध एक सिक्स लगावला होता. सचिनचा तो अविस्मरणीय फटका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्याने तब्बल 18 वर्षांनी वेस्ट इंडिज लिजंड्सच्या टिनो बेस्ट (Tino Best) विरुद्ध अगदी तसाच सिक्स मारला.
भारताची फायनलमध्ये धडक सचिन तेंडुलकरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर इंडिया लिजेंड्सनं या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. युवराज सिंहचे 20 बॉलमध्ये 49 रन हे देखील भारताच्या इनिंगचे वैशिष्ट्य ठरले. युवराजने यावेळी एकाच ओव्हरमध्ये चार सिक्स लगावले. या स्पर्धेत एका ओव्हरमध्ये चार सिक्स लगावण्याची कामगिरी युवराजने दोनदा केली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका लिजेंड्स विरुद्धच्या मॅचमध्ये देखील युवराजने चार सिक्स लगावले होते. वेस्ट इंडिज लिजेंड्ससमोर विजयासाठी 219 रनचे आव्हान होते. निर्धारित 20 ओव्हरमध्ये त्यांची टीम 6 आऊट 206 पर्यंतच मजल मारु शकली. आता फायनलमध्ये भारताची टक्कर कोणासोबत होणार गुरुवारी होणाऱ्या श्रीलंका लेजंड्स आणि दक्षिण अफ्रिका लेजंड्समध्ये होणाऱ्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. या स्पर्धेची फायनल 21 मार्च रोजी होणार आहे.