मुंबई, 27 मार्च : जगातला महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला कोरोनाची लागण झाली आहे. मागच्याच आठवड्यात सचिन रायपूरमध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज (Road Safety World Series) खेळत होता. यानंतर आता या सीरिजमध्ये खेळलेल्या युसूफ पठाण (Yusuf Pathan) यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सचिन आणि युसूफ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. या दोघांनीही स्वत:ला घरातच क्वारंटाईन करून घेतलं आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये इंडिया लिजंड्सची टीम चॅम्पियन ठरली होती. या सीरिजमध्ये खेळलेले दोन्ही खेळाडू पॉझिटिव्ह आल्यामुळे आता अन्य खेळाडूंबाबतची साशंकताही वाढली आहे. या सीरिजमध्ये भारताकडून सचिन, सेहवाग, युवराज, इरफान पठाण, युसूफ पठाण, मोहम्मद कैफ, एस.बद्रीनाथ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू खेळले होते. ‘कोरोना दूर ठेवण्यासाठी मी योग्य खबरदारी घेत होतो आणि चाचणी देखील करत होतो. मात्र तरीदेखील सौम्य लक्षण आढळून मी पॉझिटिव्ह आढळलो आहे. घरातील इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह आहेत. मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी आवश्यक प्रोटोकॉल्सचे पालन देखील करत आहे. मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानतो जे मला आणि देशातील इतरांना पाठिंबा देत आहेत. सर्वांनी काळजी घ्या,’ असं ट्वीट सचिनने केलं.
‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. घरामध्येच स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. संपूर्ण खबरदारी आणि औषधं घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी लवकरात लवकर कोरोनाची टेस्ट करून घ्यावी,’ असं युसूफ पठाण म्हणाला आहे.