मुंबई, 3 नोव्हेंबर : टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan) यांच्यातला सामना सुरू असतानाच बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या कोचची (Team India Coach) घोषणा केली आहे. राहुल द्रविड (Rahul Dravid) याची टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर लगेचच सुरू होणऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये द्रविड रवी शास्त्रींची जागा घेईल. द्रविडची मुख्य कोच म्हणून नियुक्ती केली असली तरी द्रविडसोबत बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग कोच कोण असेल? याची माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. सध्या विक्रम राठोड बॅटिंग कोच, भरत अरुण बॉलिंग कोच आणि आर.श्रीधर फिल्डिंग कोच आहेत. या तिघांचा कार्यकाळही वर्ल्ड कपनंतर संपत आहे. विक्रम राठोड यांनी पुन्हा एकदा बॅटिंग कोचच्या पदासाठी अर्ज केला आहे, तर राहुल द्रविडचा विश्वासू पारस म्हांब्रेने बॉलिंग कोचच्या पदासाठी अर्ज केला आहे. येत्या काही दिवसात उरलेल्या पदांचीही घोषणा करण्यात येईल. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर राहुल द्रविडने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारतीय क्रिकेट टीमचा कोच होणं हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. या जबाबदारीची मी आतुरतेने वाट बघत आहे. रवी शास्त्री कोच असताना टीमने उत्कृष्ट कामगिरी केली. मी कोच झाल्यानंतर आम्ही आणखी पुढे जाऊ. यातल्या बहुतेक मुलांसोबत मी एनसीए, अंडर-19 किंवा इंडिया-एमध्ये काम केलं आहे. प्रत्येक दिवशी प्रगती करण्याची त्यांची इच्छा आहे, हे मला माहिती आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये मोठ्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करायला तयार आहे,’ असं राहुल द्रविड म्हणाला.
पुढच्या दोन वर्षांसाठी राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच असेल. या दोन वर्षांमध्ये टीम इंडिया आणखी एक टी-20 वर्ल्ड कप आणि वनडे वर्ल्ड कप खेळणार आहे. राहुल द्रविड याआधी टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून गेला होता. भारताचे मुख्य खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे राहुल द्रविडला ही जबाबदारी देण्यात आली होती. टीम इंडियाचा पूर्णवेळ प्रशिक्षक होण्यासाठी द्रविड सुरुवातीला फारसा इच्छुक नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला कोच होण्यासाठी तयार केलं, यानंतर त्याने या पदासाठी अर्ज भरला. भारत आणि न्यूझीलंड सीरिजला टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच 17 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजमध्ये 3 टी-20 आणि दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.