मुंबई, 08 जुलै : मुंबईतील रिक्षाचालकाच्या मुलीने नुकत्याच बर्लिनमध्ये झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकमधील पोहण्याच्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या कामगिरीमुळे तिच्यासह तिच्या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असताना मिळवलेल्या या यशाबद्दल चेंबूरमधील रहिवाशांनी तिचा भव्य सत्कार करीत मिरवणूक काढली. कसा झाला प्रवास? चेंबुरमधील पंचशीलनगर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या प्रसिद्धी कांबळेने सुवर्णपदक मिळत ही कामगिरी केली आहे. प्रसिद्धीचे वडील प्रकाश कांबळे हे रिक्षा चालवतात. तर त्यांची पत्नी सुषमा कांबळे या गृहिणी आहे. कांबळे कुटुंबीयाची आर्थिक परिस्थिती जेमतेम त्यामुळे आपल्या मुलीला नेहमीच्या शाळेत शिक्षण देणे त्यांना परवडत नव्हते. त्यामुळे वडिलांनी तिला स्पेशल सुलभा शाळेत दाखल केले. मात्र शाळेतील क्रीडा शिक्षक सुनील आडे आणि मुख्याध्यापिका अनुराधा जठार यांनी प्रसिध्दी हिची खेळातली आवड पाहून तिच्याकडून पोहण्याची तयारी करून घेतली.
आपल्या मुलीची आवड पाहून प्रकाश कांबळे प्रसिद्धीला घाटकोपर येथील ओडियन तरण तलाव आणि नंतर चेंबूर येथील जनरल अरुण कुमार वैद्य तरण तलावात स्विमिंगच्या प्रशिक्षणासाठी घेऊन जात होते. याचा सर्व खर्च वडील आणि शाळा करत होती. पोहण्यातील तीची प्रगती बघून क्रीडा शिक्षक आणि प्राचार्यांनी तिला बर्लिन येथे सुरू असलेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याकरिता तयारी करून घेतली घेतली. बर्लिन इथल्या स्पेशल ऑलम्पिक स्पर्धेसाठी प्रसिध्दीची निवड झाली. नुकत्याच झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक स्विमिंग स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात 25 मीटर फ्रीस्टाइल मध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्पेशल ऑलम्पिक जर्मनीच्या बर्लीन इथे 17 ते 25 जूनदरम्यान आयोजित करण्यात आली होती. यात 26 क्रीडा प्रकारात 190 देशांतील 7 हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. विशेष खेळाडूंसाठी 3 हजार प्रशिक्षक आणि 20 हजार स्वयंसेवक हजर होते.
Nagpur News : नागपूरच्या ऋषिकाची भरारी, चीनमधील स्पर्धेत करणार देशाचं प्रतिनिधित्व, Video
मुलीचा सार्थ अभिमान तिच्या या विजयामध्ये तिच्या शाळेचा आणि शाळेतील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. तर देशासाठी सुवर्णपदक आणि रौप्यपदक जिंकल्यामुळे मला माझ्या मुलीचा सार्थ अभिमान आहे. सरकारने तिला पुढील वाटचाली करीता मदत करावी जेणे करून येत्या काळात भारतासाठी आणखी सुवर्ण पदक मिळविण्यासाठी तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला मदत होईल, असं मत सुषमा कांबळे व्यक्त करतात.