मुंबई, 18 मार्च : आयसीसीच्या अंपायर डेव्हलपमेंट पॅनेलमध्ये दोन भारतीय महिलांची निवड झाली आहे. यात महाराष्ट्रातील एका महिलेचा समावेश आहे. दोन्ही महिलांचे मुंबई क्रिकेट असोसिएशनने अभिनंदन केलं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वृंदा राठी आणि तामिळनाडु क्रिकेट असोसिएशनच्या जननी एन यांची निवड झाल्याचं आयसीसीने जाहीर केलं आहे. मुंबईची असलेल्या वृंदा राठीने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केलं आहे. तिने गेल्याच वर्षी बीसीसीआयच्या पंचांसाठी असलेली लेवल 2 ची परीक्षाही ती उत्तीर्ण झाली आहे. याआधी तिने मुंबईत अनेक स्थानिक सामन्यांमध्ये स्कोररची भूमिका बजावली आहे. स्कोरर ते पंच अशी झेप घेतल्यानंतर आता तिने थेट आयसीसीच्या पॅनेलमध्ये स्थान मिळवलं आहे. अनेकदा सवयीमुळे खेळाडू मैदानावर वृंदाला मॅडम ऐवजी सर अशी हाक मारतात. टी20 स्पर्धेत भाग घेणारी आणि अंपायरिंग करणारी वृंदा राठी पहिली भारतीय महिला आहे. अंपायरिंगबद्दल बोलताना तिने सांगितलं होतं की, मैदानावर कडक उन्हात तुमचं कौशल्य सुधारण्याची गरज आहे. शारीरिक कष्ट, संयम आणि खंबीर मानसिकता याची आवश्यकता असते. हाव-भाव, संभाषण कौशल्य, समयसुचकता इत्यादी गोष्टी महत्वाच्या ठरतात असंही वृंदा म्हणाली होती.
याआधी भारताकडून जीएस लक्ष्मीने मॅच रेफरींच्या पॅनेलमध्ये पहिल्यांदा स्थान पटकावलं होतं. गेल्या वर्षी मे महिन्यात जीएस लक्ष्मीची नियुक्ती करण्यात आली होती. मॅच रेफरी म्हणून कामकाज पाहण्यास ती योग्य असल्याचं सांगतं तिची निवड केली होती. पाहा VIDEO : श्रेयस अय्यर आणि पांड्याचा सेल्फीसाठी जुगाड, केएल राहुलने दिला सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसेक ही पुरुषांच्या सामन्यात अंपायर म्हणून काम पाहणारी पहिली महिला ठरली आहे. तिने मार्च महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या सामन्यात पंच म्हणून काम केलं. लवकरच जीएस लक्ष्मी पुरुषांच्या सामन्यात मॅच रेफरी म्हणून दिसेल. हे वाचा : कोरोनाची धास्ती, भारतातून परतलेले आफ्रिकेचे खेळाडू 14 दिवस सेल्फ क्वारंटाइन