रांची, 26 फेब्रुवारी : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) मागच्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या निवृत्तीनंतर सार्वजनिक जीवनातील धोनीचं दर्शन आता कमी झालं आहे. या महिन्यात चेन्नईमध्ये झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2021) धोनी उपस्थित राहील अशी अपेक्षा होती. पण, तेव्हा देखील धोनीच्या फॅन्सची निराशा झाली. रांचीतील फार्म हाऊसमध्ये शेतीचा प्रयोग करणाऱ्या धोनीनं शुक्रवारी झारखंडमधील तमाडच्या दिवडी मंदिरातील देवीचं दर्शन घेतलं. धोनी त्याच्या मित्रासह देवीच्या दर्शनाला आला होता. धोनी येणार म्हणून मंदिराच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. धोनीचं खास नातं रांचीपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवडी मंदिरातील देवीवर धोनीची मोठी श्रद्धा आहे. धोनी भारतीय टीमकडून खेळत असताना एखादी सीरिज सुरू होण्यापूर्वी या मंदिरात नेहमी जात असे. 2011 साली धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय टीमनं क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता. त्या ऐतिहासिक विजयानंतर धोनी पत्नी साक्षीसह या मंदिरात दर्शनासाठी आला होता. हे मंदिर 700 वर्ष जुनं असून या मंदिरात काली मातेची साडे तीन फुट उंचीची सोळा हातांची देवी आहे. 13 व्या शतकामध्ये सिंहभूममधल्या मुंडा राजानं युद्धात पराभूत झाल्यानंतर या मंदिराची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी युद्धामध्ये गमावलेलं राज्य परत मिळवलं,’ अशी श्रद्धा आहे. मध्ययुगीन काळातील हे मंदिर सध्या महेंद्र सिंह धोनीच्या नियमित जाण्यानं प्रसिद्ध आहे. बरोबर वर्षभरापूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये देखील धोनीनं या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी धोनीनं त्याच्या चाहत्यांना निराश न करता त्यांच्यासोबत सेल्फी देखील काढले होते.
( वाचा : IPL 2021: सनरायजर्स हैदराबादच्या चाहत्यांसाठी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा खास संदेश ) धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स (CSK) टीमचा तो कॅप्टन आहे. चेन्नईची मागच्या वर्षीची कामगिरी निराशाजनक झाली होती. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांना ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यात अपयश आलं होतं. आता या सिझनमध्ये हे अपयश पुसण्याची जबाबदारी स्पर्धात्मक क्रिकेटशी संपर्क तुटलेल्या धोनीच्या खांद्यावर आहे.