धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 4 एप्रिल : कोरोनामुळे बंद पडलेले खेळ आता सुरू झाले आहेत. त्यामुळे खेळांना आता पुन्हा पूर्वीसारखं महत्व प्राप्त होऊ लागलं आहे. महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, बुलढाणा यासारख्या ग्रामीण भागातले अनेक उमदे तरुण तालमीत जाऊन स्वतःचं शरीर घडवत कुस्तीमध्ये आपलं नाव मोठं करण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे मुंबई तील कुर्ल्यात प्रथमच ‘कुर्ला केसरी 2023’चे आयोजन करण्यात आले होते. किती जणांचा होता सहभाग? महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा असली तरी आता फार कमी मुलं कुस्ती खेळण्यासाठी उत्सुक असतात. सध्याची पिढी ही मोबाईलमध्ये खेळ खेळताना दिसते. यामुळे मैदानी खेळांचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात बरेच कुस्तीचे आखाडे होते. कुर्ल्यात गिरणी कामगार मोठ्या संख्येने राहत असे. यामुळे कुर्ल्यात कुस्तीच्या चार तालीम होत्या. अनेक मल्ल यामध्ये सराव करत. गिरण्या बंद झाल्या आणि याठिकाणी असलेल्या तालीम बंद झाल्या आज कुर्ल्यात फक्त दोन तालीम सुरू आहेत.
या बंद झालेल्या तालीम पुन्हा सुरू व्हाव्यात मुलांमध्ये कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी कुर्ल्यातील 110 वर्ष जुनी जय महाराष्ट्र व्यायाम शाळा आणि श्री सर्वेश्वर प्रतिष्ठान कुस्तीगीर मंडळाकडून ’ कुर्ला केसरी 2023’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 150 पैलवान सहभागी झाले होते. कोण ठरला मानकरी? कुर्ला केसरी 2023, कुर्ला कुमार केसरी 2023 तसेच महिला कुस्तीचे खास आकर्षण कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान कुर्ला पश्चिम येथे आयोजित करण्यात आले होते. यासाठी कुर्ल्यातील स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्या तर्फे कुर्ला केसरी विजेत्या पैलवानाला 1 लाख रुपये रोख आणि चांदीची गदा तर चंद्रकांत बनगर यांच्याकडून 75 हजार रोख पारितोषिक ठेवण्यात आले होते. या कुस्ती सामन्यात ‘कुर्ला केसरी 2023’ चा मान शाहू विजय तालीम गांगावेश कोल्हापूर येथील पैलवान सागर तामखडे याने मिळवला. पुणे येथील अक्षय गरुड विरुद्ध सागर तामखडे असा अंतिम सामना रंगला आणि अर्ध्या तासाच्या चुरशीच्या लढतीनंतर सागरने घुटणा डावावर बाद करून 1 लाख रोख, चांदीची गदा आणि कुर्ला केसरीचा मानकरी ठरला.
Kolhapur Jotiba Yatra : जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी येताय..? ‘या’ ठिकाणी घ्या अन्नछत्राचा लाभ
तालमी पुन्हा जिवंत व्हाव्या
कुर्ल्यात सुरुवातीपासून मिल कामगारांची वस्ती असल्यामुळे या भागात मल्ल सुद्धा त्या पद्धतीचे तयार होत असे. मिल बंद पडल्यानंतर व्यायाम शाळा देखील बंद पडल्या म्हणून कुर्ल्यातील काही पैलवान मंडळींनी एकत्र येऊन प्रथमच अशा प्रकारच्या कुस्तीच्या दंगलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्तीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, मुंबई अशा विविध भागातील पैलवान उपस्थित राहिले होते. सुरुवातीच्या काळात कुर्ल्यात चार तालमी होत्या मात्र सध्या दोन तालमी बंद झाल्या तर दोन तालीम जिवंत आहेत. त्यामुळे बंद झालेल्या दोन तालमी पुन्हा जिवंत व्हाव्या. पुन्हा पैलवान तयार व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला, असं आयोजक सुभाष लाडे यांनी सांगितले. विजयी झाल्यामुळे आनंदित आहे विश्वास दादा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून श्री सर्वेश्वर प्रतिष्ठान कुस्तीगीर मंडळ आयोजित कुर्ला केसरीमध्ये सहभाग घेतला. विजयी झाल्यामुळे मी आनंदित आहे, असं विजयी पैलवान सागर याने सांगितले.