आयपीएल फायनलमध्ये पावसाचाच खेळ, अंपायरनी घेतला महत्त्वाचा निर्णय
अहमदाबाद, 28 मे : आयपीएल 2023 मधील अंतिम सामना रविवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येणार होता. परंतु अहमदाबाद येथे पडलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना खेळवण्यात येऊ शकला नाही. तेव्हा चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यात होणाऱ्या आयपीएल फायनलबाबत सामन्याच्या अंपायर्सनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारी 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 मधील 74 वा आणि अंतिम सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात खेळवण्यात येणार होता. परंतु सामन्याच्या ठिकाणी सायंकाळ पासून जोरदार पाऊस सुरु झाला. बराच वेळ पाऊस थांबून सामना सुरु होण्याची वाट पाहण्यात आली. परंतु दिवस अखेर पर्यंत पाऊस न थांबल्यामुळे आजचा सामना उद्या 29 मे रोजी राखीव दिवशी खेळवण्यात येणार आहे. अंपायर्सनी रात्री 11 च्या सुमारास हा निर्णय जाहीर केला.
29 मे रोजी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात येणार असून हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवरच होणार आहे. आयपीएलने ट्विट करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली असून सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांची तिकीट जपून ठेवत ती तिकिटे उद्यासाठी वॅलीड राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.