सनरायजर्स हैद्राबादचा दणदणीत विजय, दिल्ली कॅपिटल्सचा विजयी रथ रोखला
मुंबई, 29 एप्रिल : आयपीएल 2023 मध्ये शनिवारी 40 वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा त्यांच्याच होम ग्राउंडवर पराभव केला आहे. सनरायजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सवर 9 धावांनी विजय मिळवला असून दिल्लीचा विजयी रथ थांबवण्यात त्यांना यश आले आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी हैदराबादकडून अभिषेक शर्माने 67, राहुल त्रिपाठीने 10, हेनरिक क्लासेनने 53, अब्दुल समदने 28, अकेल होसीनने 16 धावा केल्या. तर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाज सनरायजर्स हैदराबादच्या 6 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरले. दिल्लीच्या मिचेल मार्शने ४ तर अक्षर पटेल आणि इशांत शर्माने प्रत्येकी 1 विकेट घेतल्या.
सनरायजर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 197 धावा केल्या. विजयासाठी दिल्ली संघाला १९८ धावांचे आव्हान मिळाले असताना सलामीची आलेल्या कर्णधार डेव्हिड वॉर्नरची पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट पडली. डेव्हिड वॉर्नरला शुन्यावर बाद करण्यात हैदराबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला यश आले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून फिलिप सॉल्टने 59, मिचेल मार्शने 63, प्रियम गर्गने 12, अक्षर पटेलने 29 तर रिपल पटेलने 11 धावा केल्या. परंतु दिल्ली कॅपिटल्सला विजयासाठी दिलेले लक्ष पूर्ण करता आले नाही. अखेर सनरायजर्स हैदराबादचा 9 धावांनी विजय झाला.