मुंबई, 6 फेब्रुवारी : अंडर-19 वर्ल्ड कपच्या (Under 19 World Cup) फायनलमध्ये (India vs England) भारताने इंग्लंडचा पराभव करत पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. दिनेश बानाने (Dinesh Bana) लागोपाठ दोन सिक्स मारत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. काही वर्षांपूर्वी या टीमचा कोच ऋषिकेश कानेटकर (Hrishikesh Kanitkar) यानेही अशीच कामगिरी केली होती. अनेक क्रिकेटप्रेमी हे नाव विसरले असतील, पण कानेटकर पाकिस्तानची धुलाई करून एका रात्रीत स्टार झाला होता. कानेटकरच्या या शॉटने पाकिस्तानचं स्वप्न तुटलं. 18 जानेवारी 1998 ला कानेटकर त्याच्या करियरमधली तिसरीच वनडे खेळत होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या इंडिपेन्डन्स कप फायनलचा हा मुकाबला होता. 48 ओव्हरमध्ये 315 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 2 बॉलमध्ये 3 रनची गरज होती. कानेटकर तेव्हा स्ट्राईकवर होता. अनुभवी सकलेन मुश्ताक अखेरची ओव्हर टाकायला आला, तेव्हा भारताचा विजय अशक्य वाटत होता. सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कानेटकरने मुश्ताकच्या पाचव्या बॉलला मिडविकेटच्या दिशेने फोर मारली. या विजयासोबतच कानेटकर एका रात्रीमध्ये स्टार झाला. दुसऱ्या बाजूला उभा असलेला जवागल श्रीनाथ 11 रनवर नाबाद राहिला. कानेटकरने 1997 साली वनडे मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने भारतासाठी 2 टेस्ट आणि 34 वनडे खेळल्या. सकलेन मुश्ताकला मारलेल्या फोरमुळे ऋषिकेश कानेटकर लक्षात राहिला. वडील क्रिकेटपटू, भाऊ गोल्फर, वहिनी टेनिसपटू कानेटकरचं कुटुंबाचा खेळाशी जवळचं नात आहे. ऋषिकेशचे वडील हेमंत भारत आणि महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळले आहेत, तर त्याचा भाऊ आदित्य गोल्फ खेळायचा. ऋषिकेशची वहिनी राधिका तुळपुळे टेनिस खेळाडू होत्या. ऋषिकेश आणि त्याच्या वडिलांनीही भारतासाठी 2 टेस्ट खेळल्या. ऋषिकेश कानेटकरने 1994 साली महाराष्ट्राकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं होतं. महाराष्ट्रासाठी 14 मोसम खेळल्यानंतर तो मध्य प्रदेश टीममध्ये गेला. दोन मोसमांनंतर कानेटकर राजस्थानकडून खेळायला लागला. 2010-11 आणि 2011-12 रणजी ट्रॉफीमध्ये कानेटकरने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये राजस्थानला चॅम्पियन बनवलं. त्याच्या नावावर 146 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 10 हजार 400 रन आहेत, तसंच त्याने 74 विकेटही घेतल्या.