Team India
मुंबई, 5 डिसेंबर: मुंबई येथे ३ डिसेंबरपासून सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी मॅचमध्ये(IND vs NZ 2nd Test Series) टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने 539 धावांची आघाडी घेतली असून पाहुण्यांना विजयासाठी540 धावांचे आव्हान दिले आहे. परंतु यादरम्यान विराट कोहली आणि संघाला मोठे धक्के बसले आहेत. सामन्यातील शेवटच्या डावादरम्यान भारताकडून प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेल्या 2 खेळाडूंना मैदानाबाहेर बसावे लागले आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि शुबमन गिल(Shubman Gill) हे दोन्ही खेळाडू असून दुखापतीमुळे न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी आलेले नाहीत. त्यांच्याजागी भारतीय संघाने इतर २ खेळाडूंना क्षेत्ररक्षणासाठी मैदानात पाठवले आहे. बीसीसीआयने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे.
‘मयंक अग्रवाल संघाच्या दुसऱ्या डावादरम्यान फलंदाजी करतेवेळी उजव्या हाताला चेंडू लागला होता. त्यामुळे त्याला दुखापत झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून त्याला क्षेत्ररक्षणासाठी पाठवण्यात आलेले नाही. त्याच्याबरोबरच शुबमन गिलही पहिल्या डावातील जखमेमुळे या डावात क्षेत्ररक्षणासाठी उतरणार नाही. संघाच्या पहिल्या डावादरम्यान त्याच्या उजव्या हाताचे मधले बोट कापले गेले होते.’
दरम्यान भारताच्या या दोन्ही सलामीवीरांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्यातही पहिल्या डावात तर अग्रवाल दीडशतक झळकावले होते. 311 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने त्याने 150 धावा फटकावल्या होत्या. यासह तो या डावात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याच्याबरोबरच युवा सलामीवीर गिलनेही ४४ धावा जोडल्या होत्या. त्याच्यामध्ये या डावात पहिल्या विकेटसाठी 80 विकेट्सची भागिदारी झाली होती. मात्र पुढील दुसऱ्या डावात गिल दुखापतीमुळे फलंदाजीसाठी आला नव्हता. त्याच्याजागी चेतेश्वर पुजाराला सलामीला पाठवले गेले होते. या डावात अगरवालने अर्धशतकी योगदान दिले होते. 1 षटकार आणि 9 चौकारांच्या साहाय्याने त्याने 62 धावा केल्या होत्या.