मुंबई, 5 डिसेंबर: न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटीच्या(INDvsNZ Test Series) दुसऱ्या दिवशी, भारताच्या दुसऱ्या डावात असे काही घडले जे सहसा फार कमी वेळा घडते. भारतीय डावाच्या 12व्या षटकात एजाज पटेल गोलंदाजी करत होता आणि चेतेश्वर पुजारा(Cheteshwar Pujara) स्ट्राईकवर होता. एजाज पटेलने शेवटचा चेंडू शॉर्ट लेन्थ टाकला, जो पुजाराने मिड-विकेटवर 6 धावांवर कॅरी केला. पुजारा त्याच्या बचावासाठी आणि चौकारांसाठी ओळखला जातो पण या खेळाडूने षटकार मारताच सर्वजण थक्क झाले. दरम्यान, चेतेश्वर पुजाराने षटकार मारताच टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधून एक मजेशीर गोष्ट समोर आली. पुजाराने षटकार ठोकले तर अश्विनने (Ravichandran Ashwin)अर्ध्या मिशा कापून टाकीन असे सांगितले होते. हा किस्सा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इंग्लंड दौऱ्यावरील मालिकादरम्यानचा हा किस्सा असला तरी सध्या अश्विनचे हे चॅलेंज नव्याने ताजे झाले आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी, यूट्यूब चॅनलवर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान अश्विनने पुजाराला फिरकी गोलंदाजाविरुद्ध षटकार ठोकण्याचे चॅलेंज दिले होते. तसेच, पुजाराने आव्हान पूर्ण केल्यास अर्ध्या मिशा घेऊन मैदानात खेळायला जाईन, असेही सांगितले होते. पुजाराने इंग्लंड दौऱ्यावर एकही षटकार ठोकले नाही, पण न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात या फलंदाजाने षटकार लगावला. त्यामुळे अश्विनचे चॅलेंज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुजाराने तब्बल दोन वर्षांनंतर षटकार ठोकले आहे. पुजाराने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध षटकार ठोकला होता. पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीत केवळ 15 षटकार मारले असून त्याने आतापर्यंत 14800 हून अधिक चेंडू खेळले आहेत. पुजाराने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक ५ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर त्याने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-6 षटकार ठोकले आहेत. पुजाराने विल्यमसन, ईश सोधी आणि एजाज पटेल यांच्याविरुद्ध षटकार ठोकले आहेत.