कोलकाता, 22 नोव्हेंबर : भारत-बांगलादेश यांच्यात आज ऐतिहासिक सामना होत आहे. इडन गार्डनच्या मैदानात भारतीय क्रिकेटमधल्या गुलाबी पर्वाला सुरुवात झाली. या सामन्यात बांगलादेशनं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बांगलादेशच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. 15 ओव्हरच्या आतच बांगलादेशचा जवळ जवळ निम्मा संघ माघारी परतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशच्या फलंदाजांची अडखळत सुरुवात झाली. इशांत शर्मानं इम्रूल कायेसला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते रोहित शर्मानं. 10व्या ओव्हरमध्ये उमेश यादवच्या हातात चेंडू सोपवल्यानंतर त्यानं बांगलादेशच्या फलंदाजांचा समाचार घेतला. पहिल्याच चेंडूवर कर्णधार मोमिनूल हकला भोपळाही फोडू न देता माघारी धाडले. चहापानापर्यंत बांगलादेशला फक्त 73 धावा करता आल्या. यात त्यांनी 6 विकेट गमावल्या. बांगलादेशकडून शादमान इस्लामनं 29 धावांची खेळी केली. त्याशिवाय एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. तीन फलंदाज चक्क शुन्यावर बाद झाले यात बांगलादेशच्या कर्णधाराचाही समावेश आहे.
मात्र सामन्याच्या 21व्या ओव्हरमध्ये एका धक्कादायक प्रकार घडला. मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना त्याच्या घातक बाउन्सरमुळे फलंदाजाला माघारी जावे लागले. चहापानाच्या आधी शमीचा चेंडू लिटन दासच्या डोक्याला लागला आणि त्याला मैदानातच चक्कर आली. लिटन लागलेल्या चेंडूमुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. दरम्यान आयसीसीच्या नव्या नियमानुसार फलंदाज जखमी झाल्यास त्याच्या जागी नवा फलंदाज येऊ शकतो. त्यामुळं चहापानानंतर लिटन दास फलंदाजीसाठी उतरू शकेल नाही, हे पाहावे लागणार आहे.
लिटन दास चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे तो मैदानाबाहेर गेल्यामुळे संघाला फटका बसला आहे. लिटन 24 धावांवर खेळत होता. गोलंदाजीमध्ये भारताकडून उमेश यादवनं 3, इशांत शर्मानं 2 तर मोहम्मद शमीन एक विकेट घेतली. यात रोहित शर्मा आणि ऋद्धिमान साहा यांनी शानदार झेल घेतल्या.