यंदाच्या वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 'या' स्पिनरची निवड निश्चित? चहलचा पत्ता होणार कट
क्रिकेट हा जगभरातला आणि त्यातही भारतात विशेष लोकप्रिय असलेला खेळ आहे. त्यात यंदा क्रिकेट वर्ल्ड कप भारतात होणार असल्याने क्रिकेटरसिकांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 या काळात वन डे क्रिकेट वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या या वर्ल्ड कपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. भारताचा ‘चायनामॅन’ म्हणून ओळखला जाणारा फिरकी गोलंदाज अर्थात स्पिनर बॉलर कुलदीप यादव याची टीममध्ये निवड होण्याची शक्यता खूप जास्त असल्याचे तर्क त्याच्या सध्याच्या उत्तम कामगिरीवरून बांधले जात आहेत. त्यामुळे त्याचा सहकारी लेगस्पिनर युझवेंद्र चहलची संधी मात्र हुकू शकते, असंही बोललं जात आहे. या संदर्भात अधिक जाणून घेऊ या. भारत आणि वेस्ट इंडीज या टीम्समध्ये सध्या वन डे क्रिकेट मॅचेस सुरू आहेत. 27 जुलै झालेली पहिली मॅच जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी मॅच 29 जुलैला, तर तिसरी मॅच 1 ऑगस्टला आहे. या मालिकेदरम्यान आणि एकंदरीतच वन डे मॅचेसमध्ये कुलदीप यादव सध्या उत्तम कामगिरीचं प्रदर्शन घडवत आहे. त्यामुळे वर्ल्ड कप 2023 साठी त्याची निवड जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे.
2023 वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये रवींद्र जडेजासह दुसरा स्पिनर म्हणून कुलदीप यादवची जागा निश्चित असल्याचे आडाखे त्याच्या कामगिरीच्या आधारे बांधले जात आहेत. त्यामुळे लेगस्पिनर युझवेंद्र चहलची 2023 वर्ल्ड कप टीममध्ये निवड होण्याची शक्यता दुरापास्त असल्याचं बोललं जात आहे. कारण कुलदीप यादवने आपल्या उत्तम बॉलिंगचं प्रदर्शन घडवलं आहे. गुरुवारी, 27 जुलै रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेतल्या पहिल्या मॅचमध्ये कुलदीप यादवने 3 ओव्हर्समध्ये केवळ 6 रन्स देऊन 4 विकेट्स टिपल्या. त्यामुळे त्याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. सिलेक्टर्सनी वन डे इंटरनॅशनल टीममध्ये केलेली आपली निवड किती सार्थ आहे, याचं उत्तर त्याने आपल्या कामगिरीतून दिलं आहे. त्यामुळेच वन डे वर्ल्ड कप 2023साठी त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. कोणी देव तर कोणी गुरु, भारतीय क्रिकेटर्स यांच्या पुढे होतात नतमस्तक प्लेइंग इलेव्हन टीममध्ये रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, रविचंद्रन आश्विन यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. तसं झालं, तर लेगस्पिनर युझवेंद्र चहलसाठी जागा उरत नाही. 2022च्या टी-20 वर्ल्ड कप टुर्नामेंटसाठीही युझवेंद्र चहलची निवड झाली होती; मात्र पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्याला मैदानात उतरण्याची संधीच मिळाली नाही. यंदा, 2023 वन डे वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्येही त्याच्या बाबतीत असंच होण्याची शक्यता आहे. चहलच्या तुलनेत कुलदीप यादवची कामगिरी बरीच सरस आहे. कुलदीपने भारतासाठी 82 वन डे मॅचेसमध्ये 26.73च्या सरासरीने 138 विकेट्स घेतल्या आहेत. वन-डेमध्ये दोन हॅट्-ट्रिक घेण्याचा मोठा विक्रम कुलदीपच्या नावावर जमा आहे. तसंच, 25 रन्स देऊन 6 विकेट्स घेणं ही त्याची बॉलिंगमधली सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे निवड समितीकडून कुलदीपची वर्ल्ड कपसाठी निवड होण्याची शक्यता जास्त आहे. एकंदरीत कुलदीपच्या उत्तम कामगिरीमुळे चहलच्या करिअरवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.