यशस्वी जैयस्वाल
मुंबई : यशस्वी जैसवालनं त्याच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट टेस्ट मॅचमध्ये सेंच्युरी झळकवण्याचा पराक्रम करत स्वतःच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली. वेस्ट इंडिजविरुद्ध यशस्वीनं ही कामगिरी केली. भारताकडून पदार्पणात पहिल्याच मॅचमध्ये शतक झळकवण्याची कामगिरी या पूर्वी सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, सुरेश रैना, अब्बास अली बेग, प्रवीण आमरे आणि सुरेंद्र अमरनाथ यांनी केली आहे. आता या यादीमध्ये यशस्वी जैसवालचा समावेश झालाय. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या डॉमिनिका टेस्ट मॅचचा गुरुवारी (13 जुलै 2023) दुसरा दिवस होता. हा दिवस भारतीय बॅट्समनने गाजवला. रोहित शर्मा, यशस्वी जैसवाल यांनी उत्कृष्ट बॅटिंग करीत वेस्ट इंडिजच्या बॉलिंगचा चांगलाच समाचार घेतला. यात सर्वांत मोठा हिरो ठरला तो यशस्वी जैसवाल. यशस्वीनं त्याच्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये शतक झळकवून इतिहास रचला. या मॅचमध्ये पहिल्या दिवशी (12 जुलै 2023) भारतीय टीमची बिनबाद 80 अशी स्थिती होती. मॅचचा दुसरा दिवस मात्र भारतीय बॅट्समननी गाजवला. यशस्वी आणि रोहित शर्माच्या शतकांमुळे भारतीय टीमनं दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 विकेट गमावत 312 रन केले होते. विराट कोहली 36 रनांवर आणि यशस्वी जैसवाल 143 रनावर नॉट आउट आहेत. भारतीय ओपनर म्हणून केला हा विक्रम भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या टेस्टमध्ये भारताचा ओपनर यशस्वी जैसवालनं शानदार बॅटिंग करताना शतक झळकावले आहे. यशस्वीनं 350 बॉलमध्ये 143 रन काढले असून, तो नॉटआउट आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतीय बॅट्समननी वेस्ट इंडिजच्या बॉलर्सचा खरपूस समाचार घेतला. भारताचा 21 वर्षीय ओपनर यशस्वीनं 215 बॉलमध्ये स्वतःचे शतक पूर्ण केले. आतापर्यंत पदार्पणाच्या मॅचमध्ये परदेशी भूमीवर कोणत्याही भारतीय ओपनरला अशी कामगिरी करता आली नव्हती. आयपीएलमध्ये केली होती उत्कृष्ट कामगिरी यशस्वी जैसवालनं नुकत्याच झालेल्या आयपीएल सीझन 16 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने आयपीएल 2023 मध्ये 165 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करताना 428 रन केले होते. आयपीएलमधील चमकदार कामगिरीमुळे यशस्वीला भारताच्या क्रिकेट टेस्ट टीममध्ये स्थान देण्यात आलं. तसेच त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये संधी देण्यात आलीय. दरम्यान, आयपीएलमधून भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीमसाठी अनेक खेळाडू मिळत आहेत. आयपीएलमधील चांगल्या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या यशस्वी जैसवालनं पहिल्याच मॅचमध्ये त्याची निवड सार्थ ठरवली आहे.