WTC फायनलमधून वगळल्याने अश्विनने व्यक्त केली खंत
दिल्ली, 13 जुलै : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून यजमान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचा पहिला डाव गडगडला. पहिल्या डावात त्यांना फक्त १५० धावाच करता आल्या. भारताचा फिरकीपटू आर अश्विनने पहिला दिवस गाजवला. त्याने वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडलं. वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळण्यात आर अश्विनने मोलाची भूमिका पार पाडली. त्याने वेस्ट इंडिजचे पाच फलंदाज बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान न मिळाल्याबद्दल अश्विनने खंत व्यक्त केली. अश्विन म्हणाला की, “फायनलसाठी मी पूर्ण तयार होतो.” अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्यानं त्याने नाराजी उघड व्यक्त केली. आता वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने पाच विकेट घेत कर्णधार, प्रशिक्षकासह निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिलं. सामन्यासाठी तयारी केल्यानंतरही खेळायला संधी दिली नाही तर स्वत:ला सिद्ध कसं करणार असा प्रश्न अश्विनने विचारला आहे. जोकोविच, अल्कारेज, सबालेंका सेमीफायनलमध्ये; भारताचा दिग्गजही खेळणार पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर अश्विन म्हणाला की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमुळे मला खूप दु:ख झालं. आम्ही दोन वेळा फायनलमध्ये पोहोचलो पण जिंकू शकलो नाही. त्यामुळे मला आतून वाईट वाटलं. आता इथं वेस्ट इंडिजविरुद्ध नव्याने चॅम्पियनशिपची चांगली सुरुवात करणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. माझ्या या कामगिरीने मी खूप आनंदी आहे. संघाने नव्या हंगामाची जबरदस्त सुरुवात केलीय. फायनलमधून वगळल्याच्या प्रश्नावर अश्विन म्हणाला की, मी याआधीही बोललो आहे. फायनलसाठी मी पूर्णपणे तयार होतो. मी शारिरीक सरावही केला होता आणि प्लॅनही आखला होता. जेव्हा तुम्ही पूर्ण तयारी करता आणि शेवटी सामनाच खेळायला मिळू नये तर अशा वेळी स्वत:ला सिद्ध कसं करणार? जगात कोणीच असा क्रिकेटर किंवा माणूस नाही ज्याने चढ-उतार अनुभवले नाही. तुम्ही जेव्हा खाली असता तेव्हा तुम्हाला दोन पर्याय मिळतात एक तर तुम्ही बोला आणि तक्रार करा. किंवा मागे जा आणि शिका. मी त्यापैकी एक आहे जो शिकतो.