जोहान्सबर्ग, 13 डिसेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातल्या 3 टेस्ट मॅचच्या सीरिजला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधी दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मोठा धक्का बसू शकतो. दक्षिण आफ्रिकेचा विकेट कीपर क्विंटन डिकॉक (Quinton de kock) अखेरच्या टेस्टमधून बाहेर होण्याची शक्यता आहे. क्विंटन डिकॉक वडील बनणार असल्यामुळे तो अखेरच्या टेस्टमधून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिकॉकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 शतकं केली आहेत. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार क्विंटनची पत्नी साशा प्रेगनंट आहे आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ती बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे क्विंटन डिकॉक कमीत कमी एका टेस्टमधून बाहेर होऊ शकतो, पण बायो-बबलच्या नियमांमुळे त्याला दोन टेस्टना मुकावं लागण्याचीही शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ही सीरिज आधीच अडचणीत सापडली आहे. क्विंटन डिकॉकऐवजी काईल वेरेन आणि रेयान रिकलटन यांच्यापैकी एका विकेट कीपरला संधी मिळू शकते. वेरेन याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यात जून महिन्यात टेंबा बऊमाच्या जागी खेळला होता, पण त्याला फार यश मिळालं नाही. 3 इनिंगमध्ये त्याने 39 रन केल्या. 27 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. रिकलटनला अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही.