India vs New Zealand
मुंबई, 3 डिसेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील मुंबई टेस्टला आता सुरूवात झाली आहे. दरम्यान, दोन्ही संघात अनेक बदल केले असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सामनदरम्यान एक खास गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे संघातील बदलाने 133 वर्षापूर्वीच्या जुन्या रेकॉर्डशी बरोबर केली आहे. मुंबई कसोटीत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे कर्णधार बदलले. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून विराट कोहली परतला आहे. तर किवी संघाला केन विल्यमसनशिवाय मैदानात उतरावे लागले. त्याच्या जागी टॉम लॅथम कर्णधाराची धुरा सांभाळत आहे. यापूर्वी कानपूर कसोटीत अजिंक्य रहाणे भारताचा आणि विल्यमसन न्यूझीलंडचा कर्णधार होता. अशाप्रकारे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेत आले. असेच काहीसे 1888-89 मध्ये इंग्लंड-दक्षिण आफ्रिका झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत घडले असल्याचे पाहायला मिळत आहे. 1888-89 च्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार वेगवेगळे कर्णधार बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1888-89 मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑब्रे स्मिथ इंग्लंडचे प्रमुख होते आणि ओवेन ड्युने दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मॉन्टी बॉडेन इंग्लंडचा कर्णधार आणि विल्यम मिल्टन दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार झाला. टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई कसोटीत भारताचे तीन आणि न्यूझीलंडचे एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहेत. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही कोपराच्या दुखापतीमुळे खेळत नाहीये.