मॅनचेस्टर, 9 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट मॅच (India vs England 5th Test) संकटात सापडली आहे. टीम इंडियाचे ज्युनियर फिजिओ योगेश परमार (Yogesh Parmar) यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने रडीचा डाव खेळला आहे. मॅनचेस्टर टेस्टमधून भारताने माघार घ्यावी आणि सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवावी, अशी ऑफर इंग्लंडने दिली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी मात्र ही धक्कादायक ऑफर धुडकावून लावली. इंग्लंडची ही ऑफर ऐकून विराट कोहली मात्र चांगलाच नाराज झाल्याचं वृत्त आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून (ECB) जेव्हा ही ऑफर मिळाली तेव्हा बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत बातचित केली, पण या दोघांनी या ऑफरला नकार दिला. आम्ही टेस्ट मॅच खेळण्यासाठी तयार आहोत, असं दोघांनी सांगितलं. इंग्लंड क्रिकेट बोर्ड सीरिजची उरलेली टेस्ट मॅच पुढे ढकलण्यासाठी इच्छुक नाही, त्यामुळे त्यांनी टीम इंडियाला पाचव्या टेस्टमधून माघार घेण्याची ऑफर दिली. इंग्लंड क्रिकेटच्या या ऑफरमुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. विराट आणि रोहित यांनी मात्र स्पष्ट शब्दात आम्ही माघार घेणार नाही, असं सांगितलं आहे. टेस्ट मॅच रद्द करून भारताला 2-1 ने विजयी घोषित करा किंवा ही टेस्ट दोन्ही बोर्ड ठरवतील तेव्हा खेळवा, अशी भूमिका विराट आणि रोहितने घेतली आहे. विराट आणि रोहितने दिलेला हा संदेश बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डापर्यंत पोहोचवला आहे. यानंतर आता पुढची भूमिका काय घ्यायची, याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड विचार करत आहे. पुढच्या वर्षी जुलै महिन्यात भारतीय टीम इंग्लंडला जाऊन वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. या सीरिजमधून भारताने माघार घेतली तर इंग्लंडचं कोट्यवधींचं नुकसान होणार आहे, याचा विचारही इंग्लंड क्रिकेट बोर्डाला करावा लागणार आहे. योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भारतीय टीमने स्वत:ला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करून घेतलं आहे. तसंच गुरुवारचा सरावही रद्द करण्यात आला. सगळ्या खेळाडूंची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. याचे रिपोर्ट आल्यानंतर बीसीसीआय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड, मेडिकल टीम आणि युकेचे आरोग्य अधिकारी पुढची भूमिका ठरवतील. योगेश परमार यांच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंनाही आयसोलेशनमध्ये पाठवलं जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे. याआधी चौथ्या टेस्टदरम्यान टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.