टीम इंडियाची बॅटिंग सपशेल फेल
हेडिंग्ले, 25 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची बॅटिंग (India vs England Third Test) पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. पहिल्या 50 मिनीटांमध्येच टीम इंडियाचे सुरुवातीचे तीन बॅट्समन आऊट झाले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्याचा हा निर्णय टीमच्या चांगलाच अंगाशी आला. जेम्स अंडरसनच्या (James Anderson) भेदक बॉलिंगचा सामना करणं भारतीय खेळाडूंना जमलंच नाही. ओपनर केएल राहुल (KL Rahul) शून्य रनवर, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 1 रनवर आणि विराट कोहली 7 रन करून आऊट झाले.
जेम्स अंडरसन याने भारताच्या सुरुवातीच्या तिन्ही विकेट घेतल्या, तर विकेट कीपर जॉस बटलरने (Jos Buttler) तिन्ही कॅच पकडले. गेल्या काही काळापासून टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची समस्या सातत्याने पुढे येत आहे. हेडिंग्लेमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाली. मागच्या दोन वर्षात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांना एकही शतक करता आलेलं नाही. चेतेश्वर पुजाराची इंग्लंडमधली सरासरी फक्त 20 रनच्या आसपास आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजच्या सुरुवातीपासूनच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्या फॉर्मविषयी आणि त्यांना टीममधून डच्चू देण्याविषयी चर्चा सुरू होत्या, पण लॉर्ड्स टेस्टमध्ये या दोघांनी महत्त्वाची पार्टनरशीप केली. अजिंक्य रहाणने लॉर्ड्स टेस्टमध्ये अर्धशतक झळकावलं. लॉर्ड्समधल्या ऐतिहासिक विजयानंतर विराटने तिसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये बदल केले नाहीत, पण भारताची मधल्या फळीने पुन्हा एकदा निराशा केली आहे.