cheteswar pujara
इंदौर, 02 मार्च : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदौरमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या डावात १०९ तर दुसऱ्या डावात भारतीय संघ १६३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावा करत ८८ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात १६३ धावा केल्या. आता ऑस्ट्रेलियासमोर फक्त ७६ धावांचे आव्हान असणार आहे. दरम्यान, दुसऱ्या डावात ५९ धावांची खेळी करणारा भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने टीम इंडिया जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसऱ्या डावात एका बाजूला भारतीय फलंदाज मैदानावर फक्त हजेरी लावायचे काम करत असताना पुजारा भक्कमपणे उभा होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर त्याने संयमी खेळ केला. पुजारा म्हणाला की, ही अशी खेळपट्टी आहे ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. इथं खेळणं कठीण नाहीय. तुम्हाला डिफेन्सिव्ह खेळण्यावर विश्वास असायला हवा. इथं चेंडू पिचपर्यंत पोहचणं गरजेचं आहे आणि त्याचे लेंथ लवकर ओळखायला हवी. मला हे माहितीय की आपल्याकडे खूप धावा नाहीत पण संधी तर आपल्याकडेही आहे. IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा लायनच ‘किंग’, दुसऱ्या डावात 8 विकेट घेत केला विक्रम भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १६३ धावाच करू शकला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फक्त ७६ धावांचे आव्हान मिळाले आहे. भारतीय संघाला दोन्ही डावात धावांसाठी झगडावे लागले. केवळ चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात मैदानावर तग धरला. त्याने १४२ चेंडू खेळून काढत ५ चौकार आणि १ षटकार मारत ५९ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा म्हणाला की, खेळपट्टी अशी आहे की तुम्ही सतत डिफेन्सिव्हसुद्धा खेळू शकत नाही. जर तुम्ही प्रत्येक चेंडू अडवायला गेलात तर अचानक एखादा चेंडू उसळेल आणि तुमच्या ग्लोव्हजला लागेल. तुम्हाला इथं आक्रमकता आणि डिफेन्सिव्ह यात संतुलन साधायला हवं.