बॉर्डर गावस्कर ट्रॉफी विषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबई, 13 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यापैकी नागपूर येथे झालेला पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. यानंतर आता 17 मार्च पासून दिल्ली येथे दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. अशातच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी विषयी महत्वाची अपडेट समोर आली असून आता तिसऱ्या कसोटी सामन्याचे ठिकाण बदण्यात आले आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा कसोटी सामना हा हिमाचल येथील धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता. परंतु या स्टेडियमवर प्रत्यक्षात आऊटफिल्डचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. 12 फेब्रुवारीला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी केली, त्यानंतर तिसऱ्या कसोटी मालिकेचे ठिकाण आता बदण्यात आले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोहाली, पुणे, विशाखापट्टणम आणि बंगळुरू ही पर्यायी ठिकाणे मानली जात आहेत. परंतु बीसीसीआयने ट्विट करून आता याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीसाठी इंदौर येथील होळकर स्टेडियम निश्चित केले आहे. तेव्हा 1 ते 5 मार्च दरम्यान तिसरा कसोटी सामना हा इंदौर येथे खेळवला जाईल.