ऐन सामना सुरु असताना Disney+ Hotstar ची सेवा ठप्प, चाहते नाराज
मुंबई, 17 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा कसोटी सामना पारपडत असून यादरम्यान एक मोठी गडबड झाली आहे. लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरु असताना ओटीटी प्लॅटफॉर्मची सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक क्रीडा प्रेमींना हा सामना पाहण्यात अनेक अडचणी येत आहेत. Disney + Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्रिकेट प्रेमी सामना पाहण्याचा आनंद घेत असतात. त्यात आज दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये वेगळाच उत्साह होता. परंतु याच दरम्यान Disney + Hotstar प्लॅटफॉर्म डाउन झाल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने युजर्स करत आहेत. अचानकपणे अनेक युजर्सना लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत.
अचानकपणे Disney + Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मबाबत लोक तक्रारी करत आहेत. सोशल मीडियावर देखील लोक याविषयी व्यक्त होत असून ओटीटी प्लॅटफॉर्म युजर्सच्या मते ते मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीवर Disney+ Hotstar अॅक्सॅस करू शकत नाहीत. गेल्या 1 तासापासून या ओटीटी प्लॅटफॉर्मची सेवा बंद आहे. परंतु या संदर्भात अद्याप अधिकृतपणे कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. केवळ OTT प्लॅटफॉर्मच नाही तर कंपनीची वेबसाइट hotstar.com देखील डाऊन आहे.
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार ही समस्या मुख्यत्वे भारताच्या प्रमुख शहरांमधील युजर्सना येत आहे. यामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले युजर्स दिल्ली, लखनऊ, नागपूर, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरू येथील आहेत. दरम्यान ऐन सामना सुरु असताना OTT प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यामुळे नेटकरी आणि क्रिकेट प्रेमी नाराजी व्यक्त करीत आहेत. तसेच ट्विटरवर #HotstarDown हे ट्रेंड होत आहे.