नागपूर, 10 फेब्रुवारी : नागपूरच्या खेळपट्टीवर फलंदाजांना एक एक धाव काढण्यासाठी झगडावं लागत असताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने शतक झळकावलं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्माने टॉड मर्फीच्या चेंडूवर चौकार मारून शतक पूर्ण केलं. भारताकडून कर्णधार म्हणून त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक करण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. त्याच्या आधी श्रीलंकेचा तिलकरत्ने दिल्शान, दक्षिण आफ्रिकेचा फाफ डुप्लेसिस आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक केलं होतं. रोहित शर्माचं कसोटीतलं हे नववं शतक आहे. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माचं हे ४३वे शतक ठरले. रोहित शर्माने शतकानंतर जल्लोष केला.
हेही वाचा : धोनी, विराटलाही जमलं नाही; रोहितने शतक झळकावत घडवला इतिहास रोहितचं शतक पूर्ण झालं तेव्हा नॉन स्ट्रायकर एंडला रविंद्र जडेजा होता. त्याने रोहितला आलिंगन देत त्याचं अभिनंदन केलं. तर स्लीपमध्ये उभा असलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने टाळ्या वाजवून रोहितच्या खेळीचं कौतुक केलं. बीसीसीसीआयने रोहितच्या शतकाचा व्हिडीओ शेअर केला आहे. भारताने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एक बाद ७७ वरून खेळायला सुरवात केली. तिसऱ्या सत्रात भारताच्या १०७ षटकात ७ बाद ३१० धावा झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी एका बाजूने गडी बाद होत असताना रोहित शर्मा मैदानात टिकून होता. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात आघाडी मिळवली.