दुबई, 20 जुलै : टीम इंडियाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आयसीसीच्या महिला वनडे क्रमवारीत (ICC ODI Rankings Women) 762 पॉईंट्ससह पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर डावखुरी स्मृती मंधाना (Smriti Mandhana) बॅटिंग क्रमवारीत नवव्या क्रमांकावर आली आहे. 16 वर्षांमध्ये मिताली नवव्यांदा पहिल्या क्रमंकावर पोहोचली आहे. याआधी पहिल्या क्रमांकावर असलेली वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सीरिजनंतर टेलरला 30 पॉईंट्सचं नुकसान झालं आहे.
बॉलर्सच्या यादीमध्ये झूलन गोस्वामी पाचव्या क्रमांकावर आहे. टॉप-10 बॉलर्समध्ये ती एकमेव भारतीय आहे, तर ऑलराऊंडरच्या यादीत दीप्ती शर्मा 10 व्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रमवारीत भारताची शफाली वर्मा पहिल्या क्रमांकावर आणि स्मृती मंधाना तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये स्मृतीने 70 रनची खेळी केली होती. स्मृतीची ही करियरमधली सर्वोत्तम कामगिरी आहे.